४२२ शिक्षकांचे लसीकरण
चंदन मोटघरे
लाखनी
चंदन मोटघरे
लाखनी : शालेय शिक्षकांना कोराेना लसीकरण घेणे आवश्यक करण्यात आले असून लस न घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथिमक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लसीकरण झाले नाही अशा शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने मागविली आहे.
शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. लाखनी तालुक्यात पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणारे ८५४ शिक्षक आहेत, तर १६१ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आठवी ते बारावीपर्यंतला अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापकांची संख्या ४२८ आहे. त्यापैकी ४२१ शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यात ४६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत वर्ग सुरू झालेले आहेत. तालुक्यात सात हजार ६७८ विद्यार्थ्यांपैकी चार हजार १८२ विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहत आहेत. लसीकरण मोहिमेत शासनाने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व खासगी शाळेतील शिक्षकांचा उपयोग करून घेतला. लसीकरण जनजागृती व डाटा एन्ट्री करण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. काही शिक्षक लसीकरणापासून वंचित आहेत. काही शिक्षकांनी पहिला डोस घेतला, तर दुसरा शिल्लक आहे. काही शिक्षकांनी रक्तदान, मधुमेह व इतर आजारामुळे लसीकरण केलेले नाही . शासनाने शिक्षकांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे; परंतु विद्यार्थ्यांचे लसीकरण शिल्लक आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. शालेय परिसरात विद्यार्थी खेळू बागडू लागले आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.
कोट
शिक्षकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. तालुक्यात १३ शिक्षकांचे लसीकरण शिल्लक आहे. काही शिक्षकांचे आजारामुळे लसीकरण होऊ शकले नाही. लसीकरण मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आहे.
- सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी, लाखनी.