चारगाव रेतीघाटावर मशीनने रेतीचे खनन
By admin | Published: June 22, 2017 12:25 AM2017-06-22T00:25:39+5:302017-06-22T00:25:39+5:30
तालुक्यातील चारगाव रेती घाटातून मशीनच्या सहाय्याने अवैध रेती उपसा मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु आहे.
नदीचे अस्तित्व धोक्यात : महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील चारगाव रेती घाटातून मशीनच्या सहाय्याने अवैध रेती उपसा मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु आहे. येथे राजकीय पाठबळ व महसूल प्रशासनाच्या कामचुकार वृत्तीमुळे रेती माफियांचे मनोबल उंचावले आहे. नियम धाब्यावर बसवून रेतीची सर्रास तस्करी सुरू आहे. रेतीच्या दररोजच्या वाढत्या उपसामुळे नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील नदी पात्रातील रेतीला मोठी मागणी असून येथील रेती दर्जेदार व गुणात्मक दृष्टया दर्जेदार आहे. येथील रेतीला नागपुरात प्रचंड मागणी आहे. तुमसर तालुक्यातील चारगाव येथील रेतीघाट १ कोटी २७ लक्ष ७ हजार ७८६ रूपयाला लिलाव झाला असून ३० सप्टेंबरपर्यंत रेती उपसा करण्याची परवानगी आहे. लिलाव नियमात यंत्राने रेती उपसा करता येत नाही असे स्पष्ट निर्देश करारात नमूद आहे. मात्र येथील रेतीघाटावर सर्रासपणे यंत्राच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरु आहे.
असाच प्रकार येथून तीन कि.मी. अंतरावरील नदी घाटावर सुरु असताना निदर्शनात आले होते. असा अहवाल महसूल प्रशासनाने तयार करून बाम्हणी घाट बंद करण्यात आले होते. चारगाव (दे.) येथील रेती घाटावर यंत्राने रेतीचा सर्रास उपसा सुरु आहे. त्यावर महसूल प्रशासन गप्प आहे. या रेती घाटावर पहाटेच्या सुमारास मशीन नदी पात्रात नेली जाते. सकाळी ९ वाजता मशीन नदी पात्रातून काठावर नेली जाते. पुन्हा सायंकाळी मशीन नदीपात्रात नेऊन रेतीचा उपसा केला जातो.असा क्रम येथे सुरू आहे. काही रेती येथे नदी काठावर डम्प केली आहे. दिवसा येथून मशीनने रेती लोडींग करण्याचा देखावा करण्यात येतो. सुरूवातीला मजुरांकडून रेती ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येऊन नदी काठावर ती रिकामी केली जात होती, हे विशेष.
येथे ट्रॅक्टर, ट्रक चालकांचे मोठे नेटवर्क आहे. रेती घाटापर्यंत या रेती तस्करांचे जाळे तयार झाले आहे. रेती घाटाच्या दिशेने अनोळखी व्यक्ती तथा वाहन गेल्यास रेती घाटातून काढली जाते. बुधवारी सकाळी ८.३० दरम्यान मशीन रेती घाटात उतरली. त्यानंतर येथे कुणी चौकशीकरिता आल्याचा सुगावा लागताच एकच खळबळ उडाली. मशीन केवळ दहा मिनिटात रेती घाटातून काढण्यात आली.
महसूल अधिकाऱ्यांनी येथे सुट दिल्यानेच रेतीची लुट सुरु असल्याचा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. तालुक्यातील सुकळी (दे.) तामसवाडी (सि.), वाहनी, चांदमारा, वारपिंडकेपार या रेती घाटावरूनही अवैध रेतीची तस्करी सुरू आहे. स्थानिक ट्रॅक्टर चालकांनी रेतीची लुट येथे सुरू केली आहे. रेती तस्करांची टोळी येथे सक्रीय आहे. तुमसर तालुक्यातील रस्त्यावर पहाटे व सायंकाळच्या सुमारास अवैध रेती वाहून नेणारे ट्रॅक्टर सर्रास धावताना दिसतात. त्यांना येथे निश्चितच अभय प्राप्त आहे. महसूल प्रशासन तथा खनिकर्म विभागाचे दुर्लक्षाचे कारण काय? हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांशवेळा या तालुक्यात थातूरमातूर कारवाई केली जात असल्याचे दिसून आले आहे.
यंत्राने रेती उपसा करणे नियमबाह्य आहे. चारगाव रेती घाटावर मशीनने रेती उपसा सुरु असेल तर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल. त्यानंतर रेती घाट बंद करण्यात येईल. रेती उत्खनन मशीनने करता येत नाही.
- निलेश गौंड,
नायब तहसीलदार, तुमसर.