मांगली बांधचे सरपंच प्रशांत मासूरकर यांनी स्वतःच्या परिवाराला प्रथम लसीकरण करीत इतरांना प्रेरणा दिलेली आहे. पालांदूरचे युवा सरपंच पंकज रामटेके यांनी स्वतः लस घेत इतरांना प्रोत्साहित केले. नागरिकांनी शासनाच्या त्रिसूत्रीचा वापर करावा. गावातील प्रत्येक तरुणांनी व ज्येष्ठांनी लसीकरण करून घ्यावे. मी स्वतः लस घेतली असून, लस पूर्णतः सुरक्षित आहे. आपण जबाबदार नागरिक या नात्याने शासन सूचनांचे पालन करून लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबतच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सूरज वाणी यांनी, नागरिकांसाठी दोन वेळेत लसीकरणाचे वेळापत्रक तयार केले असून सकाळी ४५ च्या पुढील वयोगटासाठी, तर १८ ते ४४ वयोगटासाठी दुपारी २ ते ५ ही वेळ नियोजित केली आहे, असे सांगितले. लस घेतल्यानंतर साधा ताप व थकवा जाणवू शकतो. यात नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. लसीकरण अत्यंत सुरक्षित व आवश्यक आहे. कुणाला शंका असल्यास ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे निराकरण केले जाईल. त्यामुळे पात्र लाभार्थींनी लसीकरणाकरिता दिलेल्या वेळेत हजर रहावे, असे आवाहन डॉ. वाणी यांनी केले आहे.
लसीकरणासाठी सरपंचांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:35 AM