किन्ही येथील शालीकराम लाला सोनवणे व पुष्पा शालीग्राम सोनवणे यांना वन हक्क कायद्याखाली मिळालेल्या पट्ट्याच्या जमिनीपैकी पुष्पा सोनवणे यांच्या जमिनीवर वन विभागातर्फे पेरणी करण्यास अळथळा करण्यात येण्याच्या विरोधात सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या साकोली शाखेतर्फे लाभार्थ्याच्या प्रत्यक्ष जमिनीवर सत्याग्रह करून पेरणी करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साकोली यांनी गांभीर्याने दखल घेऊन वन विभागासोबत संपूर्ण प्रकरणावर चर्चा करून वन विभागाला निर्देश दिले. त्या अनुषंगाने शनिवार रोजी सहायक वनसंरक्षक राठोड यांनी लाभार्थ्यासह पक्षाच्या शिष्टमंडळास चर्चेला बोलाविले. प्रकरणाची संपूर्ण माहिती शिष्टमंडळाला दिली. झालेल्या चर्चेमध्ये असे निष्पन्न झाले की, लाभार्थ्यास मिळालेली जमीन व भूमिअभिलेख विभागाने केलेली मोजणी ही प्रत्यक्ष जीपीएस मोजणीमध्ये आलेल्या नकाशाप्रमाणे दिसत नाही. त्यामुळे हा घोळ निर्माण झालेला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करता येत नाही म्हणून पावसाळा संपल्याबरोबर सॅटेलाइट नकाशा समोर ठेवून, जीपीएस मोजणीची व प्रत्यक्ष जमिनीची सांगड घालून संपूर्ण जमिनीची फेरमोजणी करण्यात येईल. त्यात लाभार्थ्याची जमीन कमी निघाली तर त्यांना तेवढी जमीन देण्यात येईल, असे ठरविण्यात आले. लाभार्थ्यांनी त्यास मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने सोमवारी होणारे जमिनीवरील पेरणी सत्याग्रह तूर्तास स्थगित करण्यात आले, असे नियोजित आंदोलनाचे नेते शिवकुमार गणवीर यांनी कळविले आहे.
चर्चेमध्ये पक्षातर्फे शिवकुमार गणवीर, तालुका सचिव दिलीप उंदीरवाडे व विर्सीचे विभागीय सचिव नितीन वासनिक यांच्यासह वन विभागाचे साकोली वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे, सहायक वन परिक्षेत्राधिकारी अधिकारी खांडेकर हजर होते.