लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा तेरा हजारी पार गेला आहे. मात्र संसर्गीत व्यक्तीला पुन्हा परत त्याची लागण झालेली नाही, ही एक चांगली गोष्ट समोर आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार६१२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १३ हजार ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र यापैकी एकही जणांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोनामुळे गत वर्षभरात ३२८ जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीत २०५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. बरे झालेल्यांनी स्वतःहून काळजी घेतल्याने ते बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत. या बाबीचा अन्य लोकांनीही धडा घ्यायला हवा. मास्क, सोशल डिस्टंसिंग, नियमित हात धूणे आणि सॅनिटायझरचा वापर हाच काेरोनापासून मुख्य बचाव असल्याचेही पूर्ण झालेले व्यक्ती आता सांगत आहेत.
कोरोनाबाबत जिल्हा आरोग्य विभागामर्फत सातत्याने जनजागृती केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी आकस्मिक भेट देत तपासणी करण्यात येत आहे. क्वारंटाइन झालेल्यांनी स्वत:हून काळजी घेतल्याने पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही.
- डॉ. निखिल डोकरीमारे, आरएमओ बाह्य विभाग जिल्हा रूग्णालय भंडारा
बॉ्क्स
मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय
कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे. मास्कचा सदैव आणि योग्य वापर करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करीत असते. साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी २० सेकंदापर्यंत व्यवस्थित हात धूतल्यास संसर्गाचा फैलाव होणार नाही. याची काळजी प्रत्येकानेच घ्यावी लागणार आहे. साबण व पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तिन्ही नियमांचे पालन केल्यास कोरोनावर सहज नियंत्रण मिळविणे शक्य होइल.
अंटीबाडी किती महिन्यांपर्यंत प्रभावी
काेराेनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. प्लॉझ्मा दान करून अन्य रूग्णाला जीवदान देण्याचेही कार्य सुरू आहे. कोरोना झालेल्यांमध्ये ॲंटीबॉडी तयार झाल्यानंतर प्लॉझ्माच्या रूपाने ते किमान महिन्याभरापर्यंत प्रभावी राहू शकते, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर आजही संशोधनात्मक कार्य सुरूच आहे.