लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकीकडे व्हॅक्सिनअभावी नागरिकांचे लसीकरण थांबले असले तरी जिल्ह्यातील सात लक्ष ६० हजार जनावरांचे लसीकरण १ जूनपासून करण्यात येणार आहे. यामुळे तोंडखुरी, गायखुरी, घटसर्प एकटांग्या यासारख्या आजारापासून जनावरांची मुक्तता होऊ शकेल.
विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण पार पडले होते. भंडारा जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात गाय वर्ग श्रेणीतील पशुधनाची संख्या २ लक्ष ३८ हजार ६७४ इतकी असून, त्यानंतर कुक्कुटवर्गीय पशुधनाची संख्या २ लक्ष ७० हजार २५९ इतकी आहे. जिल्ह्यात ९० हजार १६१ एवढ्या म्हशींची संख्या आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जनावरांना विविध आजाराची लागण होत असते. लाळ्याखुरयुक्त हा विषाणूजन्य आजार असून, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. त्यामुळे पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुधनाला लसीकरण केले जाते. हे लसीकरण दरवर्षी करण्यात येते.
यापूर्वी गत नोव्हेंबर महिन्यात लसीकरण ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यात कोरोना संकट काळातही कमी कर्मचारी असतानाही जनावरांना लसीकरणाची मोठी जबाबदारी पार पाडण्यात आली होती. लसीकरणांतर्गत दरवर्षी पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे लहान जनावरांना दवाखान्यात व मोठ्या जनावरांना पशुपालकांच्या घरी जाऊन ही लस देण्यात येते. पीपीआर लस शेळ्यांना दर तीन वर्षांनी तर इतर सर्व लसीकरण दर सहा महिन्याच्या कालावधीत करावे लागते. कमी कर्मचारीसंख्या असतानाही लसीकरण ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे गत सहा वर्षांत भंडारा जिल्ह्यात कोणत्याही साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून आला नाही, ही येथे उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
लाळ्याखुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते. पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी ठराविक वेळेत लसीकरण करून सहकार्य करावे.
डॉ. नरेश कापगते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. भंडारा
पशुपालक म्हणतात...
दरवर्षी सहा महिन्यानंतर आम्ही पशुधनाला लसीकरण करीत असतो. विशेषतः तोंडखुरी व एकटांग्या व घटसर्प आजार जनावरांमध्ये पाहायला मिळतो. मात्र योग्य वेळी लसीकरण झाले तर जनावरांना रोगाची लागण होत नाही .
- बळीराम कुटे, पशुपालक भंडारा
नोव्हेंबर महिन्यात माझ्याकडील पशुधनाला लसीकरण केले होते. त्यामुळे कुठल्याही आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आली नाही. आता १ जूनपासून लसीकरण होणार आहे. पशुसंवर्धन विभागाचेही सहकार्य लाभत आहे.
- एकनाथ दखणे, पशुपालक भंडारा