लाेकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून मादी बिबटाची प्रतीक्षा सुरू केली होती. बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ती आली आणि पिलाला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. हे दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. परिसरात बिबटाचे वास्तव्य असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पवनी तालुक्यातील चकारा येथे पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी सकाळी बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला होता. वन विभागाने तेथे धाव घेतली. याच परिसरात बिबट असल्याने तो आपल्या पिलाला घेण्यासाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यावरूनच अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे व वनकर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त वाढविली. तसेच दोन ट्रॅप कॅमेरे लावले. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी आपल्या बछड्याला तोंडात पकडून नेत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बुधवारी दिवसभर या बिबटाचीच चर्चा परिसरात होती. पडक्या वसाहत परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली. वनविभागाचे अधिकारी परिसरात तळ ठोकून होते.
परिसरात भीतीचे वातावरण- चकारा येथील मोडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आणि सायंकाळी त्या बिबट्याला घेऊन जाणारी मादी कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य सिद्ध झाले. परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी अड्याळ येथे एक अस्वल शिरली होती तर दुसऱ्या दिवशी चिचाळ येथील शेतमजुरावर हल्ला केला होता. आता बिबट आणि तिचे बछडे असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.- अड्याळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र वन्यजीवांचे वास्तव्य दिसून येत आहे. लगतच्या अभयारण्यातून ही जनावरे अड्याळ परिसरात पाणी आणि चाऱ्याच्या शोधात येत आहेत. गोसे धरण आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. दहा वर्षापूर्वी क्वचित दिसणारे वन्यप्राणी आता ठिकठिकाणी दिसून येत आहेत. कवलेवाडा शिवारात दोन बिबट विहिरीत पडून मृत्युमुखी पडण्याची घटनाही ताजी आहे.