भंडारा : पवनी तालुका कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणा व चिंतामणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे शिवारफेरी व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषितज्ज्ञ डॉ. सुधीर धकाते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, शेतकरी वासुदेव हटवार यांच्यासह परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषितज्ज्ञ सुधीर धकाते यांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम भेंडीसाठी काय मापदंड असतात, भेंडीची प्रतवारी, कीडरोग, खत, पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून विविध पिकांविषयी मार्गदर्शन करून शेतकरी गटाचे महत्त्व सांगितले. यावेळी खैरी दिवान येथील शेतकरी वासुदेव हटवार यांच्या शेतावरील निळे, पिवळे चिकट सापळे प्रात्यक्षिक दाखवून, रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांच्या खर्चावरील बचत व पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. शेतकरी कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन विविध कीडरोगांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी वासुदेव हटवार यांनी केले. यावेळी खैरी दिवान व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.