लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सदर तरूण जांब येथील असून गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.बंडू मरकाम (४२) रा. जांब ता. मोहाडी असे मृताचे नाव आहे. बुधवारी जांब येथे आरोग्य पथक तपासणी करीत होते. त्यावेळी बंडूची प्रकृती बरी नसल्याचे पुढे आले. त्यामुळे त्याला जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जाण्यास सांगितले. त्यावरून बंडू आरोग्य केंद्रात गेला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याची ऑक्सिजन पातळी ३५ टक्के आढळून आली. त्यामुळे त्याला बुधवारी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत एक कर्मचारी त्याच्यासोबत पाठविण्यात आला.
भंडारा येथे त्याची अन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आरोग्य केंद्राचा कर्मचारी सोबत होता. दरम्यान गुरूवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाबाहेर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या खिश्यात चिठ्ठी आढळली. त्यावरून त्याची ओळख पटली. तसेच त्याचा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आढळून आला. यावेळी त्याच्यासोबत कुणीही नातेवाईक नव्हते. पोलिसांनी मृत्यूनंतर पुन्हा कोरोना टेस्ट केली असता तो निगेटिव्ह आढळून या घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली. दरम्यान बंडूच्या पत्नीने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणानेच आपल्या पतीचा मृत्यू झाला असून या प्रकाराला जबाबदार असणाºया डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याच्यासोबत कुणीही नातेवाईक नव्हते. फ्ल्यू वॉडार्तून आयसोलेशन वॉर्डात जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात.-डॉ. प्रशांत उईके,जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.सदर रुग्णाला भंडारा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. भंडारा येथे पाठविताना त्याच्या पत्नीला सूचना देण्यात आली. प्रतीक्षा करूनही ती आली नाही. उशिर होत असल्याने आरोग्य केंद्राचा एक कर्मचारी सोबत देवून रुग्णवाहिकेने त्याला भंडारा येथे रवाना करण्यात आला. त्याला दाखल करेपर्यंत सदर कर्मचारी सोबत होता. नंतर तो औषधी घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात गेला.-डॉ. एस.एम. बोरकुटे, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, जांब.सदर प्रकरणी काही व्यक्ती तक्रार घेवून आंधळगाव पोलीस ठाण्यात आले होते. परंतु याप्रकरणात भंडारा येथे मर्ग दाखल करून चौकशी सुरू होती. तसे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.-दीपक वानखेडे,ठाणेदार, आंधळगाव.