चाहूल खरीप हंगामाची : कर्जासाठी धावपळ सुरुराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतशिवारातून निघणारे धूर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचे संकेत देत आहे. जणू या धुरातून धुक्याची अनुभूती होत आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. उकाडा सहन करीत बळीराजा शेतीत राबायला सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मुख्य पीक असल्याने मशागतीसाठी शेतकरी बांधावर जावून अनावश्यक केरकचरा काढत आहे. हा काडीकचरा पेटवत आहे. पेटलेल्या कचऱ्यातून निघणारा धूर खरीप हंगाम सुरु झाल्याची चाहूल देत आहे. घरी निघणारा दररोजचा केरकचरा, जनावरांचे शेण, वर्षभर खड्ड्यात घातलेल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ते खत शेतात टाकत आहे. धान शेती बेभरवशाची झाली आहे. घरी दाणा येईपर्यंत काही खरे नसते. उत्पादन खर्चाएवढा भाव शेतमालाला मिळत नाही, हे वास्तव असले तरी सगळे विसरून सगळे राबायला सज्ज होतो. वर्षभराचे घरी खायला पिकले तरी शेतकरी समाधानाने झोपतो. परंतु असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही, ज्याच्यावर कर्ज नाही. बँक, सावकार हातउसणे आदी कर्जाचा भार शेतकऱ्यांवर असतो. शेतीतून कर्जाची परतफेड होईल, याची शाश्वती नसणारा शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जाच्या खाईत जावून पडतो. तिथून निघणे अवघड असते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न, सण आदीचा खर्च शेतकरी कसा करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मायबाप सरकारला कळल्या नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कराल तर टिकाल असे बोलले जाते. ते खरे असेलही. परंतु प्रत्यक्षात हे शक्य नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे, खत, कीटकनाशके शेतीपयोगी साहित्यांचा भाव वाढतच आहे. शेतकऱ्यांना हवा उत्पादन खर्चाएवढा भाव, सिंचन सुविधा, नियमित वीज, सुटीवर बियाणे, खत व अवजार साहित्य एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कितीही ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’चे गुण गायले जात असले तरी ते निरर्थकच. आजही शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. वीज कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. पाच सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पैशाची सोय करावीच लागते. तेव्हा कुठे वीज कनेक्शन मिळत असते. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असे म्हटले जाते. आता शेतकरी दु:खी राजकारणी सुखी असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष घटक योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीच १०० टक्के अनुदानावर बियाणे, खते दिली जाणार आहेत. इतर शेतकऱ्यांना बि बियाणे खताच्या योजना नाहीत. कृषी केंद्रात यावर्षी मुबलक धानाचे वाण व खते उपलब्ध झाली आहेत.- रविंद्र वंजारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.
शिवारातून निघू लागलाय धूर
By admin | Published: June 09, 2017 12:40 AM