भंडारा : जिल्ह्यातील २७ अधिसंख्य शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावून वेतन देण्यात यावे, यासह प्राथमिक शिक्षकांच्या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना उपस्थित संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, संजय आजबले, सुरेश कोरे, आदेश बोंबर्डे, नेपाल तुरकर उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, मुख्य लेखाधिकारी योगेश जाधव उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्या समस्या निकाली काढण्यात आलेल्या नाहीत. वेळोवेळी चर्चा व निवेदन देऊनही फक्त समस्या निकाली काढण्याची हमी देण्यात येते. यात काही अपवादही आहे. काही समस्या मार्गी लागल्या आहेत.
मात्र, बहुसंख्य मागण्यांना घेऊन मंगळवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सीईओ विनय मून यांची भेट घेत चर्चा केली. यात २७ अधिसंख्य शिक्षकांचा वेतनवाढीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी केली. याशिवाय जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे पगार १ तारखेला व्हावेत, यासाठी सीएमपी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी, बीडीएस प्रणाली कार्यान्वित करून प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत, बीएस्सी झालेल्या शिक्षकांना विज्ञान शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी, तसेच त्यांना विज्ञान शिक्षकाची वेतन श्रेणी द्यावी, अशी मागणी आहे.
तसेच प्राथमिक पदवीधर-विषय शिक्षकांना सरसकट ४ हजार ३०० ग्रेड पे देण्यात यावा, उच्चश्रेणी मुख्याध्यापकाच्या रिक्त जागा भराव्यात, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांमधूनच रिक्त जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती देण्यात यावी, वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव निकाली काढावेत, डीसीपीएस योजनेंतर्गत कपात केलेली रक्कम पीएफ खात्यात वळती करण्यात यावी तसेच डीसीपीएस शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम रोखीने द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी संघटनेचे रमेश सिंगनजुडे, केशव बुरडे, ज्ञानेश्वर दमाहे, श्रावण लांजेवार, सुनील निनावे, विजय चाचेरे, विकास गायधने, विठ्ठल हारगुडे, रसेशकुमार फटे, किशोर ईश्वरकर, मुलचंद वाघाये, दिलीप ब्राम्हणकर, विलास टिचकुले, अविनाश शहारे, देवराव थाटे, नरेश कोल्हे, नेपाल तुरकर, संजय भांडारकर, मंगेश नंदनवार, योगेश पुडके, आदेश बोंबार्डे, अरुण बघेले, रवी नखाते, संजय आजबले, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, विनायक कोसरे, यशपाल बगमारे, अनिल शहारे, संतोष खंडारे, तेजराम नखाते, एन. डी. शिवरकर, हरीदास धावडे, मुरारी कडव, बाळकृष्ण भुते, प्रेमलाल हातझाडे, सोनू भेंडारकर, युवराज हुकरे, वसंता धांडे, आशा गिऱ्हेपुंजे, विजया कोरे, धरती बोरवार आदी उपस्थित होते.
वेतनासाठी पुकारणार एल्गार
दरमहा १ ते ५ तारखेच्या आत प्राथमिक शिक्षकांचे वेतन झाले पाहिजे, अशी प्राथमिक शिक्षकांची फार जुनी मागणी आहे. एखादवेळी अपवाद वगळता दरमहा पगार १५ ते २० तारखेनंतरच होत आहे. याचा परिणाम शेकडो शिक्षकांना बसत आहे. वेतन झाल्यावरच तेथून विविध प्रकारचे कर्ज व अन्य हप्ते भरले जातात. मात्र, वेळेवर वेतन होत नसल्याने टेंशन वाढत जाते. यासंदर्भात अनेकदा शासन प्रशासनाला अवगत करूनही दरमहा ५ तारखेच्या आत वेतन होत नसल्याने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ एल्गार पुकारण्याच्या तयारीत असल्याचेही संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.