कुठे ऑनलाइनसाठी तर कुठे सातबारा नोंदणीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:18+5:302021-09-25T04:38:18+5:30
लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार यंदाच्या खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रांवर ऑनलाइन सात-बाराच्या आधारावर नोंदणीची प्रक्रिया सुरू ...
लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार यंदाच्या खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रांवर ऑनलाइन सात-बाराच्या आधारावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत ऑनलाइन सात-बारा, बँक खाते, आधार कार्डसह अन्य दस्तऐवजांच्या नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने कुठे ऑनलाइन सात-बारासाठी तर कुठे सात-बारा नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी शासनाद्वारे खरेदी केंद्रांतर्गत एनईएमएल वेब पोर्टल अंतर्गत नोंदणीची ३० सप्टेंबरपर्यंत अवधी देण्यात आली आहे. तथापि, शासनाने ई-पीक पाहणी ॲप अंतर्गत ऑनलाइन सात-बारा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी ॲपमध्ये अपलोड करण्यात शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
काही शेतकऱ्यांकडे मोबाइलची कमतरता, नेटवर्क समस्यांसह ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड व अपलोडींग संबंधाने असलेले अपर्याप्त ज्ञान आदी कारणांमुळे शेतकरी त्रस्त आहे.
एकूणच, ऑनलाइन सात-बारा व नोंदणी यांचा अवधी संपण्याला काही कालावधी शिल्लक असल्याने तलाठी कार्यालयासह आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. याप्रकरणी शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आधारभूत धान खरेदी केंद्रांवर सात-बारा नोंदणीचा अवधी वाढविण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
कोरोना निर्देशांचे उल्लंघन
शासनाद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत ऑनलाइन नोंदणीचा अवधी केवळ ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय व आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने शासनाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे उल्लंघन होत आहे.
240921\1256-img-20210924-wa0029.jpg
आधारभुत धान खरेदी केंद्रा समोर असलेली शेतकऱ्यांची गर्दी