कामगारांच्या संपाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:54 PM2019-01-23T22:54:42+5:302019-01-23T22:54:58+5:30
केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : केंद्र सरकारने आयुध निर्माणीतील उपक्रम, साहित्य कंत्राटदारी पद्धतीने उत्पादन करण्यास दिल्याने ६० हजार कामगार बेघर झाले. परिणामी आयुध निर्माणी संबंधित क्षेत्रीय व लघु उद्योग बंद झाले. यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली. या धोरणाचा विरोध म्हणून बुधवारपासून तीन दिवसीय संपाला प्रारंभ करण्यात आला. यासंपात महिला कामगारही सहभागी झाल्या आहेत. केवळ चार-पाच कामगार वगळता सर्वच कामगार कामावर रूजू झाले नाही.
देशाची राष्ट्रीयकृत आॅल इंडिया डिफेंस एम्लॉईज फेडरेशन, इंडियन नेशनल डिफेंस वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघ व डेमोक्रेटिक मजदुर युनियन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा आयुध निर्माणीच्या प्रवेशव्दारासमोर तीन दिवसीय संप पुकारण्यात आले. यात देशांतर्गत ४१ आयुध निर्माणी, ५२ डीआरडीओ प्रयोगशाळा, एमईएस, सीओडी, आर्मी बेस वर्कशॉप, आर्मी, नेव्ही, वायुदलाच्या विविध विभागांनी प्राथमिक मागण्यांसाठी धरणे आंदोलन, उपोषण, रास्ता रोको पुकारण्यात आले होते. पण केंद्र सरकार कामगाराच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रक्षा उत्पादनाचे खासगीकरण थांबविण्यात यावे, आयुध निर्माणीमधील वर्कलोड वाढविणे व एनपीए नवीन पेंशन योजना बंद करून १९७२ ची पेंशन योजना लागू करणे या मागणीसाठी २३ जानेवारीपासून संप सुरू केले आहेत. आयुध निर्माणीतील दोन हजार ७०० कामगारांपैकी चार पाच कामगार कामावर रूजू झाले. मात्र उर्वरित कामगार संपात सहभागी झाल्याचे विश्वसनीय सुत्रानुसार माहिती आहे.
सकाळी संपात महिला कामगारांची शंभर टक्के उपस्थिती होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता सुरक्षा अधिकारी व ठाणेदार सुभाष बारसे ताफ्यानिशी पहाटे पाच वाजतापासून आयुध निर्माणी प्रवेशव्दारासमोर डेरादाखल उपस्थित होते.