तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील पोलीस पाटलांचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे प्रमाणपत्र घेताना गरजूंना मनस्ताप सहन करावा लागत होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्टेशन टोली येथील पोलीस पाटलांकडे देव्हाडी येथील पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तुमसर तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
तुमसर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देव्हाडीचा समावेश होतो. परंतु, येथे मागील अनेक महिन्यांपासून पोलीस पाटलांचे पद रिक्त आहे. शासन व जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले येथील पोलीस पाटील पद रिक्त असल्याने गरजूंना प्रमाणपत्राकरिता फिरावे लागत होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते एमडी आलम खान, देव्हाडीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोरेश्वर ठवकर यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी स्टेशन टोळीच्या पोलीस पाटील रजनी राजेश राहुल यांच्याकडे देव्हाडी पोलीस पाटलांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तुमसर तालुक्यातील काही गावांमध्ये पोलीस पाटलांचे पद रिक्त असल्याने ग्रामस्थांना प्रमाणपत्राकरिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने पोलीस पाटलांची ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी केली जात आहे.