जुना नागपूर नाका परिसरात बॅकवॉटरच्या दुर्गंधीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:00 AM2022-01-05T05:00:00+5:302022-01-04T22:18:11+5:30
गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत नेहरूनगर जुना नागपूर नाका परिसरात हायवेनंबर सहालगत पंधरा कुटुंबाचे वास्तव्य आहे. परिसर पूरबाधित असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या महापुरात येथील घरे स्लॅबपर्यंत बुडाली होती. त्यात लाखों रुपयाचे नुकसान झाले होते. त्या महापुरातून नागरिक कसेबसे सावरले. पुन्हा बॅकवॉटरमुळे जलसाठा वाढला असून, रोज पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या सातत्याने वाढणाऱ्या बॅकवॉटरने भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरातील पंधरा कुटुंबांची चिंता वाढली आहे. नागरिकांच्या घरासमोर पाणी साचले असून, पिण्याचे पाणीही दूषित झाले आहे. पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्यात विषारी श्वापदे, किडे तसेच डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील नागरिकांना अनेक रोगराईचा सामना करावा लागत असून, येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत नेहरूनगर जुना नागपूर नाका परिसरात हायवेनंबर सहालगत पंधरा कुटुंबाचे वास्तव्य आहे. परिसर पूरबाधित असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या महापुरात येथील घरे स्लॅबपर्यंत बुडाली होती. त्यात लाखों रुपयाचे नुकसान झाले होते. त्या महापुरातून नागरिक कसेबसे सावरले.
पुन्हा बॅकवॉटरमुळे जलसाठा वाढला असून, रोज पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
लोकांच्या अंगणापर्यंत बॅकवॉटर आल्यामुळे परिसरातील नाल्या पूर्णपणे तुंबल्या असून, सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे नाल्या जाम होऊन घरात पाणी शिरण्याची वेळ आली आहे.
विहीर, बोअरवेलचे पाणी दूषित
- याशिवाय विहीर, बोअरवेलद्वारे पिण्याचे पाणी दूषित झाले असून पिण्याचा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. रोजच्या वापराचे घरातील सांडपाणी थांबल्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली. त्यामुळे मच्छरांची मोठ्या प्रमाणात पैदास वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे गोसे बॅकवॉटर जलसाठ्याची पातळी कमी ठेवावी किंवा आमचे पुनर्वसन तरी करावे, अशी मनीष वाहाणे,संजय तलमले, उज्ज्वल सुखदेवे, मुन्ना बन्सोड, विलास खोब्रागडे, विकास कुंभारे, चिंचखेडे, मुकुंदा चाचेरकर, श्रीकांत खोब्रागडे आदींनी प्रशासनाला मागणी केली आहे.