पवनी तालुक्यातील ३४ गावातील स्ट्रीट लाईट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:23+5:302021-07-16T04:25:23+5:30

अड्याळ : पवनी तालुक्यातील एकूण ७८ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाईटचे देयक भरले नसल्याने २० दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा ...

Street lights off in 34 villages of Pawani taluka | पवनी तालुक्यातील ३४ गावातील स्ट्रीट लाईट बंद

पवनी तालुक्यातील ३४ गावातील स्ट्रीट लाईट बंद

Next

अड्याळ :

पवनी तालुक्यातील एकूण ७८ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाईटचे देयक भरले नसल्याने २० दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास, भीती तथा जीव मुठीत धरून अंधकारमय रस्त्यावरून वाट काढावी लागत आहे. शासनाने तातडीने वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे लावून कामकाज बंद करू, असा इशारा सरपंच संघटनांनी दिला आहे.

गत २० दिवसात पवनी तालुक्यातील त्या ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत रात्रीच्या दरम्यान ग्रामस्थांना किती त्रास होतो, याची जाण तरी आहे का कुणाला? एकीकडे ग्रामपंचायत सरपंच संघटना म्हणते की, १५व्या वित्त आयोगातून वीजबिल भरणे शक्य नाही, तर दुसरीकडे ग्राम विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार १५व्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून पथदिव्यांची वीज देयके व बंधित अनुदानातून पाणी पुरवठा योजनेची वीज देयके अदा करण्यास शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, भंडारा ग्रामपंचायत विभागाकडून तसा पत्र व्यवहार झाल्याची माहिती आहे.

पैसे खिशात आहेत ते खर्च करायचे आहेत. खर्च करण्यास अनुमती मिळाली असून, तसे आदेशही असताना जर ग्रामपंचायत ती करत नसेल तर काय अडचणी असू शकतात, याचाही विचार करणे गरजेचे झाले आहे.

कोट

यापूर्वी शासन आपल्या स्तरावर जिल्हा परिषदेमार्फत स्ट्रीट लाईट बिलाचा भरणा करत होती. आताही शासनाने तीच प्रक्रिया करावी. याचा तोडगा येत्या एक महिन्यात निघाला नाही तर पवनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना टाळे ठोकून कामकाज बंद करण्यात येईल.

अनिता गिऱ्हेपुंज, अध्यक्ष, सरपंच संघटना, पवनी तालुका

Web Title: Street lights off in 34 villages of Pawani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.