जिल्हा परिषद शाळा, पालोराचा उपक्रम
करडी (पालोरा) : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पालोरा येथील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतावर कृषी व्यवस्थापनाचे धडे गिरवित २१ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केेले. यावेळी विद्यार्थ्यांनी पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करून कृषी शिक्षक व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेती मशागत, सरी तयार करणे, बियाणे लागवड, खत, पाणी व कीटकनाशकांचे व्यवस्थापन तसेच कापणी व मळणीपर्यंतचे तंत्रज्ञान आदींचा सखोल व प्रत्यक्ष कामातून अभ्यास केला व प्रत्यक्ष कृतीतून नवनिर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पालोरा शाळेचे कृषी विषयक शिक्षक वैभव पालांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालोरा येथील रवींद्र कुकडे, प्रदीप कुकडे, केसलवाडा येथील प्रकाश साठवणे व जाभोरा येथील रामेश्वर नेवारे यांच्या शेताची निवड करण्यात आली. वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करून कृषी विषयक व्यवस्थापन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कृती करवून दाखविली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी शिक्षक व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे लागवड, खत, पाणी व कीटकनाशक आदींच्या व्यवस्थापनाचे धडे गिरविले.
पालोरा शाळेतील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या शेतात प्रत्यक्ष कृती करुन त्यांनी घेतलेल्या अभ्यासाच्या आधारावर प्रत्यक्ष बियाणांच्या लागवडीपासून ते पाणी, खत व्यवस्थापन आदींचे धडे गिरविले. नवनिर्माणाचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व नवनिर्माणाची जिद्द भविष्यात कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- रवींद्र कुकडे, शेतकरी, पालोरा.