धान उत्पादनात अग्रेसर लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात कृषी वीजपंपाने तर काही भागांत बाघ इटियाडोह धरणांतर्गत सिंचन केले जाते. गत खरीप हंगामात तालुक्यात पूर परिस्थिती, किडरोग व परतीच्या पावसाने लागवडीखालील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील पीक उत्पादकता कमी होऊन आनेवारितदेखील घट आली आहे. यासंबंध परिस्थितीत या तालुल्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची बोंब आहे. तथापि, खरीप हंगामात पीक पेरणी व लागवडीसह मजूर व मशागतीवर झालेला खर्च वजा जाता खरिपातील पीक परिस्थिती तोट्यात असल्याचे बोलल्या जात आहे.
दरम्यान, यंदा पावसाळ्यात तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने चौरासातील सिंचन विहिरीतील जलसाठ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली असून इटियाडोह धरणातदेखील पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यानुसार बाघ इटियाडोह धरण लाभ क्षेत्रांतर्गत तालुक्यातील जवळपास 3 हजार हे. क्षेत्र उन्हाळी धान पीक लागवडीखाली तर उर्वरित सहा हजार हेक्टर क्षेत्र कृषी वीजपंपाद्वारे सिंचनाखाली येणार असल्याने या तालुक्यात एकूण नऊ हजार हे. क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खरिपात झालेली पीक व आर्थिक हानीची भरपाई काढण्यासाठी या भागातील अधिकत्तम शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करीत असल्याची माहिती असून यंदाचे लागवड क्षेत्र दरवर्षीप्रमाणेच सरासरी एवढेच असल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.