कामगार संपाच्या मुद्यावर ठाम
संप मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही
वरठी : सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा होणार नसल्याची भूमिका सनफ्लॅग व्यवस्थापनाने जाहीर केली. सॅनफ्लॅग व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर अडून आहे. यावर कामगार संघटनेने तीव्र नापसंती व्यक्त करून मागण्या मंजूर होईस्तोवर संप सुरु राहण्याची घोषणा केली. कामगार संघटना आरपारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचे दिसले.
सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात अनेक दिवसापासून धुसफूस सुरु होते. कामगाराच्या मागण्यांकडे सनफ्लॅग व्यवस्थापन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांत प्रचंड रोष होता. कामगाराच्या मागण्यांबाबत व्यवस्थापनाचे उदासीन धोरण असल्याने कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. १३ मार्चपासून विविध मागण्याच्या अनुषंगाने बेमुदत संप पुकारण्यात आले आहे. संपामुळे सनफ्लॅग कंपनीतील उत्पादन पूर्णतः ठप्प पडले आहे. कंपनी सुरळीत सुरु राहावी यासाठी सनफ्लॅग व्यवस्थापनाने पूर्ण प्रयत्न केले. पण कामगार संघटनेच्या आक्रमक भूमिकेने त्याचे नियोजन फिस्कटले आहे.
कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात दर तीन वर्षांनी वेतन वाढीचा करार होतो. तो करार एक वर्षांपासून पेंडिंग आहे.
दिवाळीला देण्यात येणारे बोनस अजूनही वाटप करण्यात आले नाही. फेब्रुवारी २०२१ चे वेतन थांबविण्यात आले. २०१७ च्या त्रेवार्षिक करारात अस्थायी कामगारांना स्थायी करणे, जनरल ग्रेड कामगारांना पंचिंग तयार करणे, पंचिंग असलेल्या कामगारांना पदोन्नती करणे, आरोग्य रजा निगर्मित करण्यासह कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार रोजी देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते. पण अद्याप चार वर्षे लोटूनही याबाबत कारवाई करण्यात आली नाही.
कंपनीत येणाऱ्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी अंतर्गत कपात करण्याचा कायदा आहे. पण अजून शेकडो कामगारांचे पीएफ कपात केले जात नाही.
कामगारांना कामाचे ८ तास ठरवून दिले असताना तोकड्या मजुरीत राबवून घेऊन १२ तास काम करवून घेतल्या जाते. ८ तासाच्या वर काम करणाऱ्या कामगारांना ओव्हर टाइम देण्याचे कायद्यात नमूद आहे. पण कामगारांना ओव्हर टाइम देण्यात येत नाही. अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आले आहे. संपात सनफ्लॅग आयर्न अँड स्टील मजदूर सभा व भारतीय जनता सनफ्लॅग कंत्राटी कामगार संघ सहभागी असल्याचे संयुक्त पत्र सनफ्लॅग व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. जवळपास ३ हजाराच्या वर कामगार गेटच्या बाहेर होते.
ठाणेदार कामगारांच्या मंचावर
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस स्टेशनवर आहे. यासाठी कंपनीत तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण हे कामगार संघटनेच्या मंचावर आढळले. नुसते मंचावर न बसता यावेळी त्यांनी भाषणही ठोकले. भाषणातून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन अपेक्षित होते. पण त्यांच्या भाषणातून कामगारांच्या संपाला समर्थन जाणवले. कामगारावर आलेली संपाची नामुष्की ही व्यवस्थापनाच्या दुर्लक्षतेमुळे असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. पूर्णवेळ ठाणेदार हे प्रमुख पाहुण्यांप्रमाणे वावरताना दिसले.
स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा
कामगाराच्या संपाला स्थानिक नागरिकाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात चर्चा घडवून आणली. पण व्यवस्थापन कामगाराच्या मागण्याबाबद सकारात्मक नसल्याने चर्चा विस्कटली. या आंदोलनाला स्थानिक प्रशाशनाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, अरविंद येळणे, गणेश हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, मिलिंद धारगावे उपस्थित होते.
संप बेकायदेशीर
सनफ्लॅग व्यवस्थापनाने कामगारांच्या संपाला बेकायदेशीर ठरवले आहे.
कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात नेहमी चर्चा होतात. चर्चेत तोडगा न निघाल्यास कामगार आयुक्त यांच्यामार्फत निराकरण करण्यात येते. कामगारांच्या मागण्यांबाबत कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. २४ मार्चला सुनावणी होती. कामगार आयुक्त यांचे निकाल येण्याअगोदर पुकारलेले संप अतिघाईचे असून हे कायद्यात बसत नसल्याचे सनफ्लॅग व्यवस्थापनाचे दळवी व सतीश श्रीवास्तव यांनी चर्चेदरम्यान सांगितले. यामुळे सनफ्लॅग व्यवस्थापनाला मोठा फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले.