लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : देशभरात लम्पी या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात अजूनपर्यंत तरी या संसर्गजन्य आजाराची लागण नसली तरी काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनासह पालांदूर येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांनी पशुपालकांची रात्रीची शाळा घेत लसीकरण सुरू केले आहे. स्वच्छता पाळीत लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मचारनाचे सरपंच संगीता घोनमोडे यांसह आणखी इतर ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक सहकार्य करीत लसीकरण मोहिमेला सहकार्य केले आहे. शासन, प्रशासन स्तरावरून लसीकरणासाठी मदत मिळत आहे. पशुपालकांनी लम्पीविषयी मनात अजिबात भीती न ठेवता गोठ्यातील स्वच्छता आणि लसीकरण केल्यास नक्कीच आजार दूर होत असल्याची ग्वाही डॉ. नगराळे यांनी दिली.लसीकरणासाठी पट्टीबंधक टिचकुले, प्रमोद सहारे, परिचर अर्जुन खंडाईत, मिलिंद खोब्रागडे, संजय सेलोकेर, प्रशांत उरकुडे, गुलशन गोटेफोडे, शेंडे आणि गावचे सरपंच यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ग्रामीण भागात लम्पीबाबत विविध गैरसमज पसरविले जात असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.
८० टक्के घरात केले जाते पशुसंवर्धन
- पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत २२ गावांचा कारभार बघितला जातो. येथील शेती हाच मुख्य उद्योग असल्याने ८० टक्के घरात पशुसंवर्धन केले जात आहे. लम्पी रोगाविषयी डॉक्टर देवयानी नगराळे यांनी गावागावांत जात गावच्या सरपंचाच्या उपस्थितीत पशुपालकांना आजाराविषयी माहिती देत सावध राहण्याकरिता शून्य खर्चातील उपाय योजना सांगितलेल्या आहेत. लसीकरणात पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर, जेवणाळा व मचारना यांसह १३ गावात लसीकरण आटोपलेले आहे.