: माजी विद्यार्थ्यांसह शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
१८ लोक ०३ के
तुमसर : तुमसरातील बोसनगर येथील सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीची गणेश भवन इमारत आहे. इमारतीत जनता कनिष्ठ महाविद्यालय मागील ३७ वर्षांपासून सुरू आहे. गणेश भवन इमारतीला पाडण्याची परवानगी ट्रस्ट धारकाने प्रशासनाकडे केली आहे. तुमसर नगरपरिषद प्रशासनाने ही इमारत पाडण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पोलीस बंदोबस्त मागितला आहे.
सदर शाळा अनुदानित असून विद्यार्थ्यांच्या पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून इमारत पाडण्याकरिता हालचाली सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होऊन शाळा भरविण्याच्या प्रश्न येथे निर्माण होणार आहे. या संदर्भात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी इमारत पाडण्याची कार्यवाही तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले होते. सदर इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट शासनमान्य अधिकृत संस्थेकडून करण्यात आला नाही.
तुमसर नगरपरिषदेने स्वतः स्ट्रक्चरल ऑडिट केल्याची माहिती आहे. सदर इमारत विक्री केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. येथे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे समजते. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून गणेश भवन इमारत पाडण्याच्या कार्यवाहीला थांबविण्याचे निर्देश देण्यात यावे. अन्यथा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल. याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना शिवसेनेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनाची प्रत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी संदीप कदम व आमदार राजू कारेमोरे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा माजी विद्यार्थी अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, राहुल गभणे, जीवन वनवे, सतीश बन्सोड, अरुण डांगरे, राकेश भेलावे उपस्थित होते.