साहेब सांगा, आता आम्ही पोट भरायचे कसे? भंडारा परिसरातील परिस्थिती विदारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 01:47 PM2020-10-14T13:47:46+5:302020-10-14T13:50:03+5:30
Bhandara News, Rain, Agriculture भंडारा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने अडयाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. शेतकरी शेतातील परिस्थिती पाहून आपली आपबिती सांगत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले पण आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र आता पूर्ण कंबरडे मोडले आहे आता पोट भरायचे कसे नी कर्ज फेडायचे कसे?, असा प्रश्न बळीराजा विचारीत आहे.
अडयाळ व परिसरात पेरणीपासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना केला. त्यात घडाईपेक्षा मडाई झाली तरी शेतकरी घाबरून गेला नाही, आणि हिम्मत सुध्दा सोडली नाही पण आता परतीच्या मुसळधार पावसामुळे मात्र शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे. शेवटी शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपासमोर काहीही कुणाचेही चालत नाही. गत आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अडयाळ व परिसरात ह्यकुठे खुशी तर कुठे गमह्ण पाहायला मिळत आहे. शेतातील धान आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वाऱ्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले. यावर उपाय म्हणून बरेच शेतकरी गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतातील पाणी काढण्यात तर काही ठिकाणी शेतकरी शेतात कापणी केलेले धान्य उचलताना दिसून येत आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र अडयाळ व परिसरात पाहायला मिळते आहे.
खर्च झालेला खर्च तरी आता हातात येण्याची शक्यता कमी आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे खर्च भागवणे म्हणजे आता शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर ठीक आहे. नाहीं तर मग कर्ज भरायची कशी असा प्रश्न आहे. अडयाळ व परिसरात प्रथमत: अळी ने घात केला नंतर पावसाने. पुन्हा धानावर तुडतुडा, करपा रोगाने शेतकरी चिंताजनक स्थितीत असतानाच आता पुन्हा हा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आता मोठ्या चिंताजनक स्थितीत सापडला आहे. यावर आता पुढे अजून काय होईल याची सुद्धा चिंता असल्याने शेतकरी आज निराशेच्या छायेत आहे. यावर आता काय उपाययोजना आखली जाते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी अभय शृंगारपवार, देवेंद्र हजारे, शिवशंकर मुंगाटे, युवराज वासनिक, मधू गभने, देविदास नगरे, प्रकाश मानापुरे, मोहन कावळे, राजेंद्र ब्राह्मणकर, सुरेंद्र आयतूलवार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
याकडे आता लोकप्रतिनिधीनी सुद्धा तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी शेतातील पाणी जमेल तेवढी श्रम घेऊन काढण्यात व्यस्त दिसत आहे.