नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 11:04 AM2022-07-07T11:04:26+5:302022-07-07T11:23:42+5:30
वैनगंगेत बुडालेल्या नागपूर जिल्ह्यातील मजुराचा मृतदेह चार दिवसानंतर आढळला
अड्याळ (भंडारा) : रोपवे पुलाच्या कामावरून तोल जाऊन वैनगंगेच्या अथांग पाण्यात पडलेल्या नागपूर जिल्ह्यातील मजुराचा चार दिवसांनंतर अखेर मृतदेहच आढळून आला. घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी तरंगताना आढळून आला.
सुनील प्रभू निकेश्वर (२३, रा. मेंढा, ता. कुही, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर आंभोरानजीक रोपवे पुलाचे काम सुरू आहे. या कामावर असलेला सुनील रविवारी सायंकाळी तोल जाऊन डोंगेघाट नदीपात्रात कोसळला, तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पोलीस नावेच्या मदतीने चार दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. मुंबईवरून पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुलावरून कोसळलेल्या घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर सुनीलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेला. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता.
तीन महिन्यांपूर्वी झाला होता सुनीलचा विवाह
नागपूर जिल्ह्यातील मेंढा येथील सुनील निकेश्वर हा मोलमजुरी करून चरितार्थ चालवीत होता. त्याचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. रविवारी घडलेल्या या घटनेने घरातील कमावता तरुण हिरावून नेला. घरी पत्नी आणि वृद्ध वडील आहेत. त्याला कंपनीने १५ लाख रुपयांचा विमा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.