शाळाबाह्य बालकांची होणार शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:11+5:302021-02-27T04:47:11+5:30
राजू बांते मोहाडी : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक गाव व शहरात विशेष ...
राजू बांते
मोहाडी : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक गाव व शहरात विशेष शोध मोहीम १ ते १० मार्च पर्यंत राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबे विविध कामासाठी स्थलांतर होत असतात. तसेच कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थ्याच्या नियमित शिक्षणात खोडा निर्माण झाला आहे. नियमित शिक्षणासाठी तसेच बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी बालकांची शोध मोहीम सुरु केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या जिल्हा पातळीवरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संदीप कदम तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर बारस्कर सचिव आहेत. राज्यस्तर ते गावस्तरावर समितीचे गठन करण्यात आले आहे. गावाच्या समितीचे अध्यक्ष सरपंच असणार आहेत. या शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली जाणार आहे.
एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थितीत राहणारे ६ ते१४ वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. प्रत्येक गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसथांबे, बाजार, वीटभट्टी, झोपड्या, भीक मागणारी मुले, बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, भटक्या जमाती आदी ठिकाणी मुलांची शोध मोहीम केली जाणार आहे. शोध मोहिमेची जबाबदारी नोडल अधिकारी,पर्यवेक्षक, प्रगणक यांच्याकडे देण्यात आली आहे. विषय व जबाबदाऱ्या निश्चित केलेल्यांना प्रशिक्षण सुध्दा दिले जाणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळाबाह्य शोध मोहिमे संदर्भात पूर्वतयारी बैठक घेतली. २७ फेब्रुवारीला गावस्तर समिती सदस्यांची नियोजन बैठक होणार आहे. १ मार्चपासून बालकांची शोध मोहीम सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, हे प्रगणक म्हणून काम करणार आहेत. तर मुख्याध्यापक हे सनियंत्रण करणार आहेत.
बॉक्स
सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती हे गाव पातळीवरील शोध मोहीम व गृहभेटी सहभागी होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था,यांनी जणप्रसार व्यापक प्रमाणात करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांनी केले आहे.