लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी: अनोळखी इसमाने हातात दगड घेऊन महिलेला मारण्याची धमकी देत तिच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख शंभर रुपये हिसकावून नेले. ही घटना खुटसावरी येथील बुद्धविहाराजवळ रविवारला दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. सुनंदा रवींद्र वासनिक (५२, रा. खुटसावरी) असे लुबाडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे फिरवीत पन्नालाल गोमाजी वाळवे (३५, रा. पालोरा, ता. पाराशिवणी, जि. नागपूर) याला अटक केली आहे.
सुनंदा वासनिक या मोलमजुरीचे काम करतात. मजुरीसाठी लाखनी येथे दररोज येणे-जाणे असते. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कामावरून ऑटोने परत आल्यावर घराकडे पायी जायला निघाली असता, बौद्धविहाराजवळ अनोळखी इसमाने हातात दगड घेऊन अश्लील शिवीगाळ केली. तसेच तुझ्याजवळील सामान दे, सामान दिले नाही तर मारून टाकीन, अशी धमकी देत तिच्या गळ्यातील
दागिने, मोबाईल, चष्मा व शंभर रुपये रोख हिसकावून घेत पळ काढला. महिलेने घर गाठत घरी सर्व घडलेली हकिकत सांगितली.मुलासह पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
१२ तासात लावला छडामहिलेला धमकी देत साहित्य लुबाडून इसम फरार झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपासाची चक्रे फिरविली. चौकशी करीत अवघ्या १२ तासात पाराशिवनी तालुक्यातील पालोरा येथील पन्नालाल वाळवे याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
चार दिवसातील दुसरी घटनालाखनी येथे चार दिवसांआधी पोलिस असल्याचे भासवून वृद्धाजवळून एक लाख सहा हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा पोलिस स्टेशन हद्दीत महिलेला लुबाडल्याची घटना घडली. अशा घटनांनी नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहीद वॉर्डात ६० हजारांची चोरीभंडारा शहरातील शहीद वॉर्डात अज्ञात आरोपीने दाराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी आलमारीत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची (६० हजार) चोरी केली. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी हुमेरा शेख (३०, शहीद वॉर्ड भंडारा) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.