महासंचालकांनी नाकारली परवानगी: नवीन प्रस्ताव दाखल होणारतुमसर : शहरात खंडणी वसुली करणाऱ्या तीन आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई रद्द झाली आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका कारवाईस परवानगी दिली नाही. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पुन्हा नवीन प्रस्ताव दाखल करणार आहेत. तसे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाल्याची माहिती आहे.तुमसर येथील व्यवसायीकांकडून खंडणी मागणारे विरु फुले (३४), गोलू गभणे (२३), धिरज पडोळे (३२) यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस महासंचालकांकडे सादर केला होता. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी या कारवाईस परवानगी नाकारली. या आरोपींवर भादंवी ३८४, ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या आरोपाखाली भंडारा न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याने सध्या तीनही आरोपी जिल्हा कारागृहात आहेत. नोव्हेंबर महिन्यात मकोका कारवाईची परवानगी नाकारण्यात आली होती. दोन महिन्यानंतर पुन्हा मकोकाचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.या तीन आरोपींचा जुना रेकॉर्ड वाईट आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. जामीन कदाचित त्यांना मिळाला व पुन्हा त्यांनी एक क्षुल्लक सुद्धा गुन्हा केला तर त्यांच्या मुसक्या पोलीस आवळणार असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
तीन आरोपींवरील मकोका रद्द
By admin | Published: December 22, 2014 10:41 PM