ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा बहुतांश भाग राखीव वनात वळता करण्यात आला आहे. या जंगलात अनेक हिंस्र वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दर दिवशी जंगलातील वन्यप्राणी नागरिकांच्या दृष्टीस पडत आहेत. वाघ, बिबट्याचे दर्शन होत आहे. मुरली गावाच्या शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ जगजाहीर आहे. अशातच मुरली शिवारात रोजच वाघाचे पगमार्क दिसून येत आहेत. बिबट्याचे रोजच दर्शन होत आहे. परंतु गावकऱ्यांत वन्यप्राणी-गावकरी असा संघर्ष नाही. गावांच्या शेजारी वाघाचे पगमार्क आढळल्यानंतर जंगलाचे दिशेने नागरिकांनी जाणे बंद केले आहे. गावकऱ्यांनी जनावरांच्या चराईत बदल केला आहे. रात्री हमखास गावांच्या शेजारी वाघाचे दर्शन होत आहे. एकापेक्षा अनेक वाघ, बिबट्या असल्याचे गावकरी सांगत आहेत. पर्यटकांना जंगलात फिरण्यासाठी मज्जाव करण्यात येत नसल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती आहे. वन विभागाच्या यंत्रणेने अलर्ट होण्याची आवश्यकता आहे.
बॉक्स
रानडुकराच्या शिकारीत वाढ
रानडुकरांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून या प्राण्यांच्या टार्गेटवर शेतकऱ्यांचे शेतशिवार आहे. शेतशिवारात अन्नधान्य पिकांची प्रचंड नासाडी वन्यप्राणी रानडुक्कर करीत असल्याने स्फोटक पदार्थाने त्यांची शिकार केली जात आहे. शिकार केल्यानंतर रानडुकरांना जमिनीत पुरले जात आहे. मुरली, टेमनी, मांगली, चांदपूर, सोनेगाव, बोरगाव, गोंडीटोला, सुकली नकुल, देवरी देव, बपेरा गावांतील शेतकरी त्रस्त बनले आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गावात होत आहे.