अल्पभूधारक आणि हातावर आणून पानावर खाणारा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली जनावरांच्या भीतीने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंगोरी गावात अनेकदा वाघ, बिबट येण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यात शेळ्या, कुत्रे फस्त करण्याच्या तक्रारी बऱ्याच झालेल्या आहेत. यासंबंधी गावकऱ्यांनी वनक्षेत्राधिकारी पवनी यांना घटनेची माहिती देऊनही बंदोबस्त होताना दिसत नसल्यामुळे गावकऱ्यांपुढे संकट उभे आहे. पवनी-नागपूर रोडच्या पश्चिम दिशेची गावे व्याघ्र प्रकल्पात गेलीत, तर पूर्वेकडील सिंगोरी, वेळवा, रोहना, सिरसाला, कन्हाळगाव, गोंडी शिवनाळा, ढोरप, खातखेडा, सावरला, गुडेगाव, भोजापूर, धानोरी, आदी गावे वगळण्यात आली आहेत. या गावांना वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असल्याने येथील जनताही भयभीत आहे.
सिंगोरी गावाला सभोवताली जंगलाने वेढा दिलेला आहे. या गावात दररोज वाघ येण्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी देऊनही याकडे जंगल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. चालू आठवड्यात बोकडाला वाघाने जखमी केले. अनेक पाळीव कुत्रेदेखील मारले गेले. ही माहिती देऊनही वाघाचा बंदोबस्त करण्यास जंगल प्रशासन कुचकामी ठरत आहे. दरम्यान, सिंगोरी येथील गावकऱ्यांनी प्रस्तुत प्रकार थांबवावा म्हणून वनक्षेत्राधिकारी पवनी यांना वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंस्त्र पशूंचा बंदोबस्त करून होणारी जीवितहानी टाळण्याची मागणीदेखील निवेदनातून केली आहे.