पर्व महाशिवरात्रीचे : शांतता कलम लागू, संवेदनशीलस्थळी पोलिसांची करडी नजरभंडारा : जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर २८ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेषत: पोलीस विभागाने संवेदनशील क्षेत्रात करडी नजर ठेवली आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात शांतता कलम लागू केले आहे.पर्यटनासह तीर्थस्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शिवरात्रीच्या पावन पर्वावर ठिकठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यात लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या तिरावरील महादेव मंदिर, खुनारी येथील चुलबंद नदीच्या पात्रातील शिवतीर्थ मंदिर, पवनी शहरासह तालुक्यातील कोरंभी, महादेव, नेरला डोंगरदेव महादेव, जवाहरनगर परिसरातील झिरी देवस्थान, भंडारा शहरातील श्री बहिरंगेश्वर देवस्थान, चांदपूर पर्यटन स्थळ, श्री गायमुख तीर्थक्षेत्र, आंभोरा तीर्थक्षेत्र यासह २८ ठिकाणी यात्रा भरविली जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार १९ फेब्रुवारीला तर चार दिवसानंतर महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन होणार आहे. जिल्ह्यातील प्रसिध्द तीर्थस्थळी भरणारी यात्रा ही पाच दिवसांपर्यंत सुरु असते. याशिवाय आठ दिवसानंतर बारावीची परिक्षा सुरू होणार असल्याने टेंशन वाढले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी होणारी भाविकांची गैरसोय लक्षात घेता उत्सवाचे आयोजन करणाऱ्यांनाही आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहे. शिवरात्रीला आयोजित यात्रेत सर्वाधिक भाविकांची गर्दी भंडारा, मोहाडी, पवनी व लाखांदूर तालुक्यात पाहयला मिळते. भंडारा शहरातील श्री बहिरंगेश्वर देवस्थान परिसरात आयोजित यात्रेला विशेष महत्व आहे. यात्रेच्या निमित्ताने कोट्यवधी रूपयांची उलाढालही होत असते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात २८ ठिकाणी यात्रा
By admin | Published: February 18, 2017 12:16 AM