रोजी गेली तरी दोन लक्ष ३१ हजार कुटुंबांना मिळणार रोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:23+5:302021-04-15T04:34:23+5:30
इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे. या ...
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे. या काळात गरीब, गरजू व लाभार्थ्यांची मोठी कुचंबणा होते. अशा स्थितीत कुठलाही लाभार्थी अन्नधान्याशिवाय राहू नये, यासाठी राज्य शासनाने एक महिना नि:शुल्क धान्य वितरणाची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील दोन लक्ष ३१ हजार १८ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण केले जाणार आहे.
कोरोना महामारीच्या रूपाने अनेक देशांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कित्येक गरीब कुटुंबे भरडली गेली आहेत. अशा कुटुंबांना लाॅकडाऊन काळात किमान रोजी नव्हे, तर किमान रोटी तरी उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने नि:शुल्क धान्य देण्याचा निर्णय घेतला.
भंडारा जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या दोन लाख ३१ हजार १८ इतकी असून, त्यात सात लाख ३८ हजार ९८३ युनिटधारक आहेत. या कार्डधारकांना सदर धान्याचे वितरण केले जाणार आहे.
काय मिळणार तांदूळ गहू तांदूळ गहू
राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लॉकडाऊन काळात दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना तांदूळ आणि गहू देण्यात येणार आहे. यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना येत्या एक महिन्यासाठी प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. रेशन कार्ड असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींना देखील त्याचा लाभ दिला जाणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सदर स्धा्स धान्य दुकानातून धान्य दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण दोन लाख ५७ हजार ६१२ शिधापत्रिका धारकांची संख्या आहेत.
लॉकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम जाणवतो. राज्य शासनाने घोषणा केली असली तरी वेळेवर धान्य उपलब्ध झाले पाहिजे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे..
- अश्विन साखरे, भंडारा
अन्नधान्य मिळत असले तरी लाॅकडाऊन नको. काहीजण नियमांचे पालन करीत नाहीत. यामुळे कठोर पावले उचलली जातात. याचा भुर्दंड गरिबांनाच सहन करावा लागतो.
-अनिल वासनिक ,खुटसावरी
अन्नधान्यासोबतच अन्य मदत मिळायला हवी. १५ दिवसांनी रोजगार परत मिळणार का याची हमी दिसून येत नाही. रोज कमविणे व खाणे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मदत आवश्यक आहे.
- ईश्वर भिवगडे, पिंपळगाव