दोन हजार शिक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी ठरतात पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:00 AM2021-04-13T05:00:00+5:302021-04-13T05:00:44+5:30
शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन धोरण ठरविले आहे. हे धोरण ठरविण्यासाठी पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये या अभ्यास गटाने राज्य व विभाग स्तरावरील शिक्षक संघटना, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी, त्या विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बदली धोरण ठरविण्यासाठी शिफारशी मागितल्या.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाकडून जिल्हा परिषदेच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या नवीन धारेणानुसार सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या धोरणानुसार एकाच शाळेत पाच वर्षे सेवा झालेले जवळपास दोन हजार शिक्षक पात्र ठरणार असून त्यातील ६०० शिक्षकांचीबदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या धोरणात बऱ्याच सुधारणा असल्या तरीही सोयीनुसार बदली व्हावी, या विचारानेच बदली प्रक्रियेत मतमतांतरे कायम आहेत.
शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन धोरण ठरविले आहे. हे धोरण ठरविण्यासाठी पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये या अभ्यास गटाने राज्य व विभाग स्तरावरील शिक्षक संघटना, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी, त्या विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बदली धोरण ठरविण्यासाठी शिफारशी मागितल्या. त्यानुसार शिक्षकांच्या बदलीचे नवीन धोरण निश्चित करण्यात आले. आता या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील ८१७ शाळांतील दोन हजार शिक्षक बदलीस पात्र ठरणारे आहेत. यातील जवळपास सहाशे शिक्षकांची बदली होणार आहे. या नवीन धोरणाबाबतही शिक्षकांची कुरबूर सुरूच आहे.सध्या शिक्षकवर्ग विद्यार्थी शोधासाठी धावपळ करीत आहेत. अशात आता नवीन धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या आल्याने चर्चेला उधाण आहे.
कोणते बदल अपेक्षित आहे?
यापूर्वीच्या बदल्यांमध्ये विस्थापित किंवा रॅण्डम पद्धतीने ज्या शिक्षकांची गैरसोय झाली, अशांना यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. महिलांसाठी प्रतिकूल क्षेत्र घोषित केले पाहिजे. प्रतिकूल क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षिकांना यावर्षी सेवा कालावधीची अट न लावता विनंतीने बदली दिली पाहिजे. ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंतची सेवा बदलीसाठी ग्राह्य धरावी. जे आंतर जिल्हा बदली झालेत, त्यांच्यासाठी दहा वर्षे सेवेची अट बाळगावी. यापूर्वीच्या धोरणाप्रमाणे अवघड पाच मुख्य क्षेत्रात तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना यावर्षी बदलीची संधी द्यावी. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज करण्याची तदतूद असावी.
काय बदल केले?
एकाच शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांचीच बदली होणार. शिक्षकांचा नोकरीत नसणारा जोडीदार दिव्यांग, मानसिक विकलांग किंवा व्याधीग्रस्त असल्यास त्या शिक्षकाला विशेष संवर्ग भाग-१ चा फायदा मिळणार. माजी सैनिक असणारे जे शिक्षक आहेत त्यांनाही विशेष संवर्ग-१ चा लाभ मिळणार. बदली प्रक्रिया राबविताना प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागा दिसणार असल्याने शिक्षक विस्थापित होणार नाही. तसेच संवर्ग-१ व २ यांनी एकदा बदली घेतल्याने पुढील तीन वर्षे बदली घेणार नाही.
मागील बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदलीची संधी मिळावी. ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरावी. यासोबत प्रशासकीय बदलीसाठी ५ वर्षे व विनंती बदलीसाठी तीन वर्षे एकाच शाळेतील सेवा आवश्यक ठरावी. महिला शिक्षकांकरिता प्रतिकूल क्षेत्र घोषित करावे व त्यांनाही संधी द्यावी.
-मुबारक सय्यद,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा