मोबाईल मनोऱ्याचे अनधिकृत बांधकाम
By Admin | Published: July 4, 2015 01:29 AM2015-07-04T01:29:18+5:302015-07-04T01:29:18+5:30
लोकवस्ती असलेल्या भागत भ्रमणध्वनी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मनाई आहे. असे असतानाही, भंडारा शहरातील खात रोड
भंडारा : लोकवस्ती असलेल्या भागत भ्रमणध्वनी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मनाई आहे. असे असतानाही, भंडारा शहरातील खात रोड मार्गावरील रामनगर येथील एका इसमाच्या खाली जागेवर मोबाईल टॉवरचे अनाधिकृत बांधकाम सुरु आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असून रामनगर सुधार समितीने याबाबद एल्गार पुकारला आहे.
खात रोड मार्गावरील रामनगर वॉर्ड हा नगर पालिकेच्या हद्दीत येतो. ही वस्ती अत्यंत वर्दळीची व भरगच्च रहिवास्यांची आहे. या वॉर्डातील १४४ नंबरचा प्लॉट हा भडके नामक इसमाने निवासस्थान बांधण्यासाठी खरेदी केला होता. मात्र तिथे नियमानुसार घराचे बांधकाम न करता तो खाली असल्याने सदर प्लॉट धारकाने एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी तो करारनाम्यावर कंपनीला दिला आहे.
कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यानुसार कपंनीने खाली प्लॉटवर काही दिवसांपूर्वी टॉवर उभारण्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले. दरम्यान याची माहिती वॉर्ड वासीयांना होताच त्यांनी सदर बांधकामाविषयी माहिती घेतली असता, तिथे एका खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या परिसरातील महिला व पुरुषांनी याला प्रचंड विरोध दर्शविला. मोबाईल टॉवरचे सुरु असलेले बांधकाम बंद करण्यासाठी वॉर्ड वासियांनी रामनगर सुधार समिती गठित केली. या माध्यमातून नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांना निवेदन देवून टॉवरचे निर्माणाधीन बांधकाम बंद करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
ध्वनी लहरींमुळे आरोग्याला धोका
मोबाईल टॉवर निर्माण झाल्यानंतर त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स् लहरींचा जनमानसावर घातक परिणाम होतो. यामुळे कॅन्सर, हृदयरोग, मेंदुचे आजार, मानसिक आजार अशा दुर्धर आजाराने नागरिक ग्रासले जावू शकतात. पालकांची क्षमता कमी असल्याने याचा फटका त्यांना सहन करावा लागेल. त्या सोबतच येथील जनरेटर व धुरांमुळे वायू प्रदुषणही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉवरच्या बांधकामावर निर्बंध लावाला अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.