जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र अशी भली मोठी आरोग्य यंत्रणा आहे. मात्र, तिथे सुविधा नाहीत. या सर्व ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर रुग्णांना भंडाऱ्याला रेफर करण्याची गरज पडणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता तालुकास्तरावरील आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा सुविधा तयार झाल्या तर ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात यावे लागणार नाही व उपचारावरचा खर्चसुद्धा वाचेल. तात्पुरत्या कोविड सेंटरवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्यास कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर हा पैसा पाण्यात जाईल. शासकीय आरोग्य यंत्रणा अद्ययावत झाल्यास त्याचा कायमस्वरूपी लाभ परिसरातील रुग्णांना मिळेल, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे १५० आयसीयु, २५० ऑक्सिजन व १०० जनरल बेड तर पवनी, लाखांदूर, लाखनी,साकोली व तुमसर तालुक्यात प्रत्येकी १०० अशी एक हजार बेडची तयारी सुरू आहे. सर्व रुग्णालयांमध्ये किमान २५०० बेडची व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याशिवाय आणखी गरज पडल्यास समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात कोविड सेंटर उभारले जाऊ शकते. इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार होणे आवश्यक असून कोविडकाळात खासगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या अधिकच्या बिलांवर प्रतिबंध लावण्यात यावा, असेही निर्देश यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलेत. बैठकीला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पीयुष जक्कल, निवासी शल्यचिकीत्सक डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उके आदी उपस्थित होते.
तात्पुरत्या कोविड सेंटरऐवजी शासकीय रुग्णालये अद्यावत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:37 AM