शेती शाळेतून अद्ययावत मार्गदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:15+5:302021-07-30T04:37:15+5:30
पालांदूर : शेतकऱ्यांना नव्या जमान्यातील तांत्रिक अत्याधुनिक कृषी अभ्यास देत भात पीक शेतीशाळा घेण्यात आली. खोडकिडा, गादमाशी, ...
पालांदूर : शेतकऱ्यांना नव्या जमान्यातील तांत्रिक अत्याधुनिक कृषी अभ्यास देत भात पीक शेतीशाळा घेण्यात आली. खोडकिडा, गादमाशी, किडीचा जीवनक्रम सांगून एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर प्रमुख मार्गदर्शक होते. कृषी सहायक जे .यु. नाकाडे यांनी कृषी शाळेचे आयोजन केले होते.
शेतकरी बांधवांना शेती शाळेच्या माध्यमातून पेरणी ते कापणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. यात पऱ्हे पेरणीपासून तर नर्सरीची काळजी घेण्यापर्यंतची माहिती दिली. रोवणी पूर्वीची चिखली, पूर्व-पश्चिम रोवणी, खताच्या मात्रा, बांधातील पाण्याचे नियोजन, दाणेदार व रासायनिक कीडनाशकांचे व्यवस्थापन, आदी माहिती शेतकऱ्यांना पुरविण्यात आले. यात प्रगतिशील शेतकरी मोरेश्वर सिंगनजुळे यांनी भात पिकाविषयी च्या इतरही बाबींचा अभ्यास कृषी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. नवे कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरते या विषयात तंतोतंत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी उत्साही असल्याने कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाला सुद्धा उत्साह आला. गावचे उपसरपंच बाजीराव हेमने व गावातील इतरही शेतकरी बहुसंख्येने शेतीशाळेला उपस्थित होते.