वाकल येथे लसीकरण व कोरोना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:28+5:302021-08-23T04:37:28+5:30
पालांदूर : लाखनी तालुक्यातील वाकल ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण शिबिर व कोरोना चाचणी कार्यक्रम राबविण्यात आला. यात पहिला डोस ९५० ...
पालांदूर : लाखनी तालुक्यातील वाकल ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण शिबिर व कोरोना चाचणी कार्यक्रम राबविण्यात आला. यात पहिला डोस ९५० पात्र लाभार्थ्यांपैकी ८११ लाभार्थ्यांनी डोस घेतला. तर, दुसरा डोस ८६ लाभार्थ्यांनी घेतला. सरपंच टिकाराम तरारे यांच्या सकारात्मक प्रयत्नांनी वाकलवासीयांना कोरोनाच्या संकटात आरोग्य सुविधेचा लाभ सुरू झालेला आहे.
कोरोनाचे संकट टळले नसल्याने शासन व प्रशासन स्तरावरून लसीकरण प्रतिबंधक मोहीम वेगाने राबविली जात आहे. यात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने गावची ग्रामपंचायत, आरोग्यसेविका, अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य विभाग यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. सुरुवातीच्या लसीकरणाच्या टप्प्यात नकारात्मक विचाराने लसीकरणाकडे पात्र लाभार्थ्यांनी ठेंगा दाखविला होता. केवळ कागदावर आदेश देऊन लसीकरण शक्य नसल्याचे लक्षात आले. तेव्हा ग्रामपंचायतीच्या प्रामाणिक प्रयत्नांना पुढाकार देण्यात आला. यातून सरपंच, सदस्य, पोलीसपाटील, अंगणवाडी शिक्षिका यांचे प्रबोधन लाखमोलाचे ठरले.
वाकल येथे दोन महिन्यांत तीन लसीकरण शिबिरे घेऊन गावात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे नेले जात आहे. सरपंच टिकाराम तरारे यांनी घराघरांत जाऊन लसीकरणाचे महत्त्व थेट लाभार्थ्यांना पटवून दिले. त्यामुळे लसीकरणाचा टप्पा प्रशंसनीय ठरला. कोरोना चाचणी शिबिरसुद्धा घेण्यात आले. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली. गावात आरोग्याच्या दृष्टीने शक्य ते पाऊल उचलले जात आहे. लसीकरणासाठी डॉ. सहीम मरसकोल्हे, डॉ. अमित जवंजाळ, आरोग्यसेविका भाग्यश्री मदनकर, उपसरपंच नरेश कोचे, पोलीस पाटील आनंदराव बोरकर, ग्रामसेविका पी.व्ही. बोरकर, अंगणवाडीसेविका प्रज्ञा वालदे, आरोग्यसेवक कवाने, डॉ. चक्रधरे, डाटा ऑपरेटर, ग्रामपंचायत सदस्य तथा जागृत नागरिकांनी सहकार्य केले.