भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. 'आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, आमची लेकरं गेली' असं म्हणत मृत बालकांच्या मातांनी टाहो फोडला. तसेच सदर घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घडल्याचं सांगत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहे.
रुग्णालयाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात येत नव्हती, अद्यापही पूर्ण माहिती दिली जात नाहीयं, बालकांना भेटूही दिलं जात नाही. त्यामुळं पालकांमध्ये आणि मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे.
तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं.
भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी- नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
घटना अत्यंत वेदनादायी - राहुल गांधी
भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.