निकेश रमेश पटले दुचाकी क्रमांक एमएच ३६ ए ९०८ ने मोरगाव कडून सालेभाटा येथे येत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली, यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सालेभाटा येथे आणण्यात आले. आरोग्य केंद्रात कर्तव्यावर वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका नसल्याने प्राथमिक उपचार करता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ भडकले व तिथेच ठिय्या आंदोलन करीत प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. कर्तव्यावरील डॉक्टरांनी उपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सध्या अपघातग्रस्त निकेश जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघातानंतर कर्तव्यावर वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने जखमींना वेळोवेळी मदत मिळत नाही म्हणून जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष कैलास भगत, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, संजय रहांगडाले, विशाल पटले, कैलास पटले, तुषार रहांगडाले, संजय बोपचे, उमेश बोपचे, प्रदीप रहांगडाले, जगदीश टेंभुर्णे, कृष्णा खंडाईत, दिनेश येळेकर, राजू सार्वे, रणजीत रहांगडाले, योगेश बोपचे, तेजलाल रहांगडाले, उमेश रहांगडाले यांनी आंदोलन केले.
खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील हटनागर, डॉ. एस. डी. निखारे, आमदार नाना पटोले यांचे स्वीय सहायक राजू पालीवाल व लाखनी पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. अपघाताची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस हवालदार दिगंबर तलमले करीत आहेत.