भंडारा : गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेचे पाणी तालुक्यातील चिंचाेली येथील गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. गाव उंचावर आणि याेजना सखल भागात असल्याने नळाचे पाणी गावात पाेहाेचत नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी दाेन किमीची पायपीट करावी लागते. लाखाे रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने असंताेष निर्माण झाला आहे.
गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना २०१८ मध्ये पूर्णत्वास आली. या याेजनेअंतर्गत चिंचाेली गावाचाही समावेश आहे. ८० टक्के नागरिकांनी नळ जाेडणी केली. सुरुवातीला आठवडाभर नळयाेजनेचे पाणी आले. त्यानंतर या गावात याेजनेचे पाणी पाेहाेचले नाही. चिंचाेली गाव उंचावर असल्याने पाणी पाेहाेचण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात येते. गावात जलस्रोत आहेत; परंतु येथील पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे गाेड्या पाण्यासाठी बाराही महिने या नागरिकांना दाेन किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. यासंदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु अद्यापपर्यंत समस्या दूर झाली नाही.
पाण्यासाठी आंदाेलनाचा इशारा
दरराेज रेल्वे रुळाजवळ जाऊन पाणी आणावे लागते. महिलांना माेठी कसरत करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी सरपंच देवदास झाडेकर, ग्रा. पं. सदस्य विजय राणे, अनिल ठाकरे, विक्रम राणे यांनी नागपूर येथे जाऊन जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. तीन वर्षांपासून पाण्यासाठी कशी पायपीट करावी लागते ही समस्या तत्काळ दूर झाली नाही, तर आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
लाखाे रुपयांचा खर्च पाण्यात
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावर लाखाे रुपये खर्च करण्यात आला. त्याचवेळी याेग्य नियाेजन करून पाईपलाईन टाकली असती तर गावकऱ्यांना पाणी मिळाले असते. आता तांत्रिक कारण पुढे करण्यात येत आहे. गावाला आता दुसरी नळ याेजना देता येणार नाही, असे अधिकारी सांगत आहे.