आम्ही थकलो नाही, तुम्हीही थकू नका...चालत रहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:09+5:302021-03-08T04:33:09+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग हादरले, होत्याचे नव्हते झाले, हातचे उद्योग बंद पडले, ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग हादरले, होत्याचे नव्हते झाले, हातचे उद्योग बंद पडले, बेरोजगारीने कहर केला, अर्थव्यवस्था डबघाईला आली. मात्र, शेतकरी राजाने नियमितता ठेवत, कृषी उत्पन्नाचा आधार देत अर्थव्यवस्थेला टेकू दिला. दिवस-रात्र शेतात मेहनत घेत कोरोनाच्या संकटातही आम्ही थांबलो नाही, तुम्हीही थांबू नका. कोरोनाचे नियम तेवढे पाळा. कोरोना आज ना उद्या जाणारच! असा उमदा विश्वास महिला दिनानिमित्ताने महिला शेतकरी, मजुरांनी सर्वसामान्यांना थेट शेतशिवारातून दिला.
८ मार्चला महिला दिन साजरा केला जातो. जगातील प्रत्येक देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने सहकार्याच्या भावनेने काम करत आहेत. मनुष्याच्या प्रत्येक अडचणीत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया समस्यांचा सामना करत आहेत. पुरुष कितीही शौर्यशाली असला, तरी बिकट परिस्थितीत स्त्रीचा आधार अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक कुटुंबात पुरुषाच्या संकट काळात स्त्री साहसाने सोबत असते. याच साहसातून संकट टळून निर्भयतेकडे वाट मिळते. नेमके असेच कोरोनाच्या जागतिक संकटात शेतकरी राजाने आपल्या महिला, मजुरांच्या सोबतीने संकटावर मात करत अर्थव्यवस्थेला बळ दिले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आर्थिक बजेटला शेतीने तारले/सुधारले.
लाॅकडाऊन असतानासुद्धा महिला भगिनी शेतात ऊन-पावसात राबल्या.
सोशल डिस्टन्स सांभाळले, प्रसंगी मास्क वापरला मात्र श्रम करणे थांबवले नाही. या श्रमातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली. आज त्याच अर्थव्यवस्थेच्या भरोशावर देशाचा व राज्याचा कारभार टिकला. अशा या अर्थव्यवस्थेच्या आधारवड ठरलेल्या माता-भगिनी यांना व त्यांच्या श्रमाला महिला दिनानिमित्ताने मानाचा मुजरा!
शासनाने पुरवलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराला पळवण्याकरिता दिलेली नियमावली तंतोतंत वापरत नित्याची कामे निष्ठेने पार पाडत राष्ट्रधर्म पाळा, असे आवाहन शेतकरी महिला-भगिनींनी केले आहे.