लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रुग्णालयातून बरा हाेऊन बाळ घरी येईल. त्याच्या काेवळ्या पावलांसाेबत आनंद येईल. काेडकाैतुक करून बाळाचे सर्वजण लाड करतील. अंगाईगीत गाऊन बाळाला झाेपी घालील, असे एक ना अनेक मनसुबे ओल्या बाळंतिणीसह त्या नऊ कुटुंबातील प्रत्येकाने रचले हाेते. नियतीच्या मनात मात्र वेगळेच हाेते. हसरे अंगण क्षणात शाेकसागरात बुडाले. भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काळजाचा तुकडा हरवून बसलेल्या नि:शब्द मातांचे मूक आक्रंदन सुरू आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेने संपूर्ण देश हादरला. ज्यांच्या काळजाचा तुकडा हिरावला त्या मातांची काय अवस्था असेल. दुसऱ्या दिवशीही त्या नऊ कुटुंबात कुणाच्या पाेटात अन्नाचा कण गेला नाही. चिमुकल्यांच्या आठवणीने आणि घरी आलेल्या आप्तस्वकीयांच्या भेटीने केवळ आणि केवळ आक्रंदन सुरू हाेते.
सकाळी ९ वाजता कळले बाळ काळाने हिरावले
माेहाडी तालुक्यातील उर्सरा येथील सुकेसनी धर्मपाल आग्रे यांचे ११ दिवसाचे बाळ जिल्हा रुग्णालयाच्या काचेच्या पेटीत हाेते. शनिवारच्या पहाटे २ वाजता कुणीतरी सांगितले की बाळाच्या खाेलीला आग लागली. माझ्यासाेबत माझी आई हाेती. दवाखान्यातील लाेक इकडे तिकडे पळत हाेते. आगीचा धूर दिसत हाेता. परंतु काय झाले कुणीच सांगत नव्हते. जीव थाऱ्यावर नव्हता. अन् सकाळी ९ वाजता कळले आपलेही बाळ काळाने हिरावले, असे सांगत सुकेसनी नि:शब्द झाली. डाेळ्यापुढे तिने बाळाला दिलेले अखेरचे दूध आठवत हाेते. शून्यातील तिची नजर सर्वांच्या काळजाला चिरून जात हाेती.
आमच्या बाळाचा चेहरा काळा पडला हाेता
माेहाडी तालुक्यातील टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले यांचेही बाळ दुर्दैवी ठरले. दुर्गा रुग्णालयातच मुक्कामी हाेती. व्हरांड्यात विश्रांती सुरू हाेती. २ वाजता आरडाओरड झाली. आम्ही जागे झालाे. जळल्यासारखा गंध येत हाेता. सर्वजण सैरावैरा पळत हाेते. कुणी काहीही सांगत नव्हते. इकडून-तिकडे धावपळ सुरू हाेती. सकाळी ९.३० वाजता आम्हालाही सांगितले तुमचे बाळ गेले. हातात बाळ आले तेव्हा चेहरा काळा पडला हाेता. नऊ महिने पाेटात ठेवून बाळाला जन्म दिला. असा दिवस आम्हाला पाहायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी व्यथा सांगत दुर्गाने अश्रूंना वाट माेकळी करून दिली.
सायंकाळी ६ वाजताचे दूध ठरले अखेरचे
हाताला सूज आल्याने ३० डिसेंबरला बाळाला रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर उपचारही सुरू हाेते. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता बाळाला दूध पाजून मी वाॅर्ड क्र. ११ मध्ये गेले. बाळ कक्षात ठेवले हाेते. रात्री २ वाजता वाॅर्डातून धूर आला. आम्हाला सर्वांना बाहेर काढले. नंतर दहा मातांचे नाव घेऊन बाेलविण्यात आले. पती व नातेवाईकांना बाेलावण्यास सांगितले. ताेपर्यंत आम्हाला काहीच सांगितले नव्हते. ७ वाजता सर्व पालकांना एका वाॅर्डात बाेलावून तुमच्या बालकाला वाचविण्याचे प्रयत्न केले, पण वाचवू शकलाे नाही, तेव्हा डाॅक्टरांच्या बाेलण्यावर विश्वास बसत नव्हता. माझ्या बाळाला दाखवा, अशा आक्राेश केला. पण सकाळी १० वाजतापर्यंत माझ्या बाळाला दाखविले नाही. नंतर पाेलिसांनी बाेलाविले बाळाला ओळखून आम्ही घरी आणले. असे माेहाडी तालुक्यातील जांब येथील प्रियंका जयंत बसेशंकर सांगत हाेती. बाळाच्या आठवणीने आलेला हुदंका सर्वांचे काळीज चिरून नेत हाेता.
तीन वर्षाने लेक अंगणात आली आणि काळाने हिरावली
लग्नाला तीन वर्षे झाली. त्यानंतर कुंभरे दाम्पत्याच्या वेलीवर फूल उमलले. परंतु जगात दाखल हाेताच अबाेल मुलीने जगाचा निराेप घेतला. पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला. दुसऱ्या दिवशीही कविताचा आक्राेश सर्वांना हेलावून साेडत हाेता. कमी वजनाची बालिका म्हणून अतिदक्षता विभागात ठेवली. एक महिन्यापासून उपचार सुरू हाेते. शनिवारच्या रात्री काळाचा घाला आला आणि निरागस काेवळी कळी हिरावून नेली. एवढ्या माेठ्या दवाखान्यात त्याकडे लक्ष दिले गेले नाही. मी माझ्या पाेटच्या गाेळ्याला कायमची मुकली. मी परत आता एकटी पडली. तर पती बारेलाल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लेकीचा मृत्यू झाल्याचे सांगून कारवाईची मागणी करीत हाेते.