कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा, ज्येष्ठांना सतावतेय चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:14+5:302021-05-21T04:37:14+5:30
भंडारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० ...
भंडारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे.
४५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक प्रथम व दुसरा डोस घेत आहेत. परंतु ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रथम व नंतर दुसरा डोस घेतला, ती मंडळी आता कुटुंबातील तरुणांनाही व्हॅक्सिन कधी मिळेल, यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. लसीकरण झाल्यास या महामारीपासून आमच्या पाल्यांचा बचाव होऊ शकेल, या भूमिकेत ज्येष्ठ आहेत. शासनाने या लस उत्सवाकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा जोमाने लसीकरण सुरू करावे, अशी बाब या ज्येष्ठांसोबत चर्चेदरम्यान समोर आली.
कोट
माझी दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर असतात. मध्यंतरी कोरोना रुग्ण वाढीने चिंता वाढली होती. लसीकरणानंतर तेवढी चिंता राहात नाही. मी लस घेतली. पण, दोन्ही मुलांचे लसीकरण व्हायचे आहे.
- रामकृष्ण नंदनवार, भंडारा
मी एप्रिल महिन्यातच लस घेतली. आता दुसरा डोसही घेणार आहे. पण, माझ्या मुलांचे लसीकरण न झाल्याने चिंता सतावते. पुन्हा मोहीम सुरू होताच त्यांना लसीकरणासाठी पाठविणार आहे.
- मनोज दलाल, भंडारा
मुलांचे भविष्य सर्वच बाबतीत उज्ज्वल असावे, अशी पालकांची इच्छा असते. विशेषत: आरोग्याविषयी मी जागरूक आहे. माझ्या मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यास चिंता राहणार नाही.
-गिरीशचंद्र उजवणे, साकोली