करडी परिसरात ‘कुठे गड आला तर कुठे सिंह गेला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:38+5:302021-01-20T04:34:38+5:30

युवराज गोमासे करडी(पालोरा) : करडी परिसरात सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडली. सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरावर निवडणूक निकाल घोषित झाला. ...

'Where the fort came from, where the lion went' | करडी परिसरात ‘कुठे गड आला तर कुठे सिंह गेला'

करडी परिसरात ‘कुठे गड आला तर कुठे सिंह गेला'

Next

युवराज गोमासे

करडी(पालोरा) : करडी परिसरात सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडली. सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरावर निवडणूक निकाल घोषित झाला. या निवडणुकीत ‘कहीं खुशी, कहीं गम’चे वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी विद्यमान सत्तेला धक्का देत विरोधकांनी उलटफेर घडवून आणला. तर काही ठिकाणी प्रस्थापितांनी गड राखला.

जांभोरा येथे दोन पत्रकारांच्या गटामध्ये निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत सत्ताधारी पत्रकाराच्या गटाला जबर धक्का बसला. विरोधी पत्रकाराच्या गटाने एकूण ११ जागांपैकी ७ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर सत्ताधारी पत्रकाराच्या गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले. सत्ताधारी गटात सिंह आला पण गड गेल्याची भावना दिसून आली.

बॉक्स

एका नेत्याचा फोन जिव्हारी

करडी परिसरातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांना व स्वपक्षातील विरोधकांना हरविण्यासाठी एका वरिष्ठ नेत्याने फोन करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्याने ज्यांना हरविण्यासाठी ताकद पणाला लागली ते सर्व जिंकून आल्याचे दिसून आले. मतगणनेरम्यान या नेत्याच्या फोनची चर्चा विजयी उमेदवारांमध्ये प्रकर्षाने दिसून आली. सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

बॉक्स

देव्हाडी येथे उलटफेर

आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत म्हणून देव्हाडा ग्रामपंचायतचा उल्लेख केला जातो. या ग्रामपंचायतच्या हद्दीत मानस ॲग्रो साखर कारखाना आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी गटाला तगडा धक्का बसला. प्रमुख सत्ताधिकाऱ्यांनाही निवडणूक जिंकता आली नाही. निवडणूकीत ९ जागांपैकी ६ जागा विरोधकांनी जिंकून सत्तेला आव्हान दिले आहे. विजयाचा जल्लोष यशस्वी उमेदवारांच्या समर्थकांनी निवडणूक मतदानास्थळी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांना मतदारांनी आपल्या दारावर उभे राहण्यास मनाई केल्याने सत्तागटात खळबळ माजली होती. मतदारांचा भारी विरोध लक्षात घेता पॅनलच्या उमेदवारांनी त्यांना प्रचार करण्यासही मनाई केली होती. अखेर सत्तेचा अनुभव नसलेल्या तरुण तुर्कांनी किल्ला लढवीत अनुभवी राजकारण्यांना धूळ चारली. केवळ एक जागा सत्ताधाऱ्यांना धुऱ्यावर जिंकता आली. या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलचे ७ पैकी ६ उमेदवार अवघ्या ३ ते ७ मतांनी हरले. एवढ्या कमी मतांनी संपूर्ण पॅनल पराभूत होणारे व तरुणांनी बाजी मारून इतिहास घडविणारे हे पहिले आदिवासी गाव ठरले आहे.

बॉक्स

माजी तालुकाध्यक्ष ठरले 'किंग'

गट प्रामपंचायत खडकी येथे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षाने संघटनेत फेरबदल करत तालुकाध्यक्षाला पदमुक्त केले. त्यांनी प्रतिष्ठा विसरून ग्रामपंचायत निवडणूक लढविली व स्वत:ही लढले. त्यांना हरविण्यासाठी स्वपक्षातील काहींबरोबर विरोधकांनी कंबर कसली होती. मतदानाच्या शेवटपर्यंत त्यांना हरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. परंतु विरोधकांना धूळ चारत त्यांनी विजय संपादन केला व आपल्या गटालासुद्धा सत्ताप्राप्तीसाठी ९ पैकी ५ जागांचे संख्याबळ मिळवून दिले. तर विरोधकांना ४ जागा जिंकता आल्या. पांजरा (बोरी) गट ग्रामपंचायतमध्ये ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली. विरोधकांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. सेवा देणाऱ्यानी ५ जागा बळकावून विरोधकांना चीत केले.

Web Title: 'Where the fort came from, where the lion went'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.