नगर परिषद हद्दीतील बेवारस वाहनांचे मालक आहेत तरी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:26+5:302021-03-13T05:04:26+5:30
भंडारा : शहरात गत काही वर्षांपासून अनेक रस्त्यांवर तसेच काही रिकाम्या जागांवर वाहने बेवारस स्थितीत उभी आहेत, मात्र ...
भंडारा : शहरात गत काही वर्षांपासून अनेक रस्त्यांवर तसेच काही रिकाम्या जागांवर वाहने बेवारस स्थितीत उभी आहेत, मात्र याबाबत कोणीच तक्रार करत नसल्याने या वाहनांचे मालक नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारा शहरातील अण्णा भाऊ साठे चौक ते शीतला माता मंदिर मार्गावर, तुकडोजी वाॅर्डातील रिकाम्या जागेवर तसेच शहरातील अन्य काही भागात ही बेवारस वाहने दिसून येत असल्याने वाहतुकीला धोकादायक ठरू शकतात. मात्र असे असतानाही नागरिकांकडून कोणतीच तक्रार केली जात नसल्याचे वास्तव आहे. वाहतूक पोलिसांनाही अशा वाहनांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत.
त्यामुळे भंडारा नगर परिषदेने अशा बेवारस वाहनांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भंडारा नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसात अशा बेवारस वाहनांची शोधमोहीम राबवली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंगार वाहने शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. २४ तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना नगर परिषद भंडारामार्फत नोटिसा देण्याची गरज आहे. अशी वाहने तत्काळ न हटविल्यास तत्काळ दंड आकारून कारवाई करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून एकाच जागेवर उभी असणारी अशी बेवारस वाहने भंडारेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
बॉक्स
बेवारस वाहनांमुळे अस्वच्छतेचा प्रश्न
भंडारा शहरातील काही रस्त्यांच्या कडेला अशी बेवारस वाहने दिसून येतात. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वाहने अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे येथे अस्वच्छता पसरत असून, परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली घाण वाढत असून ही वाहने अपघाताला आमंत्रण देतात. यासोबतच येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात
भंडारा शहरातील तुकडोजी वाॅर्डात खुल्या जागेत अनेक वर्षांपासून एक वाहन बेवारस स्थितीत धूळ खात पडलेले आहे. मात्र याबाबत हे वाहन कोणाचे आहे, कधीपासून आहे याबाबत कल्पना नाही. त्यामुळे एकाच जागेवर पडून असणाऱ्या अशा वाहनांचा प्रश्न शहरात गंभीर रूप धारण करत आहे. यासाठी नगर परिषदेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे.
कोट
भंडारा शहरात काही रस्त्यांवर, घरासमोर वाहने लावलेली असतात. त्यामुळे विनाकारण जागा अडवली जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरताे. शिवाय वाहने काढण्यास सांगितले असता अनेकदा वाद होतात. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
विवेक मेश्राम, तरुण भंडारा
बेवारस वाहने नगर परिषदेने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील बहुतांश भागात अनेक गाडीमालक आपली वाहने रस्त्यावर सोडून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो.
संजय आकरे, शिवसेना पदाधिकारी, भंडारा
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अनेकदा वाहतूक कोंडी होते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण होते. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते नगर परिषदेने याविरोधात मोहीम राबविण्याची गरज आहे.
राजेंद्र खेडीकर, सामाजिक कार्यकर्ता, भंडारा