भंडारा : संपूर्ण देशाला हादरवून साेडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला जबाबदार काेण असा एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. त्या रात्री विशेष नवजात अतिदक्षता कक्षात नियुक्त असलेले ‘ते’ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी काेण? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. कक्षाला बाहेरून कडी लावून गेलेल्या ‘त्या’ नर्सचे नाव सांगण्यास प्रशासन दाेन दिवसांपासून टाळाटाळ करीत असून आराेग्य यंत्रणेतील कुणीही या विषयावर बाेलायला तयार नाही. यामागचे काय गाैडबंगाल आहे, हे कळायला मार्ग नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला. या कक्षात डाॅक्टर, नर्स, वार्ड बाॅय असणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे हा कक्ष अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जाताे. तेथे बालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिचारिकांची नियुक्ती असते. नियमाप्रमाणे इनक्यूबेटरजवळ नर्स असणे बंधनकारक आहे. मात्र घटना घडली त्यावेळी नर्स कक्षात नसल्याची माहिती आहे.
फायर ऑडिटच्या स्पष्ट सूचनाn भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना नेमकी कशी घडली, यामागचे तांत्रिक कारण काय याबाबतची संपूर्ण तपासणी सहा सदस्य असलेली चौकशी समिती करणार आहे. n फायर आणि सेफ्टी यासंदर्भात राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे किंवा नाही याची चाचपणीही करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे ऑडिट झाले असेल तरीही पुन्हा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.