वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:00 AM2021-07-29T05:00:00+5:302021-07-29T05:00:12+5:30

गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडलेले आहे. पिंडकेपार मूळ गावातील नागरिकांना बेला येथे पट्टे देण्यात आले. परंतु पिंडकेपार टोलीचा तर प्रश्न अद्यापही कायम आहे.

Will the village rise after being carried to Waingang? | वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय?

वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय?

Next
ठळक मुद्देपिंडकेपार टोलीतील गावकऱ्यांचा सवाल : दरवर्षी पावसाळा आला की काळजात होते चर्र

ज्ञानेश्वर मुंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगेला १९६२ साली पूर आला. टोलीवर आम्हाला पट्टे मिळाले. तेव्हापासून आम्ही येथेच राहत आहोत. आता गोसे धरणाने आमचे पुनर्वसन होणार आहे. अधिकारी येतात लवकरच गाव उठेल असे सांगतात. गतवर्षी तर महापुरात जीव मुठीत घेऊन रात्र काठली. आताही पावसाळा आला आहे. परंतु आमच्या गावच्या पुनर्वसनाचे काहीच खरे नाही. आता तुम्हीच सांगा. वैनगंगेत वाहून गेल्यावर आमचे गाव उठवणार काय? असा सवाल भंडारा तालुक्यातील पिंडकेपार टोली येथील नागरिकांनी केला.
गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडलेले आहे. पिंडकेपार मूळ गावातील नागरिकांना बेला येथे पट्टे देण्यात आले. परंतु पिंडकेपार टोलीचा तर प्रश्न अद्यापही कायम आहे. २००४ च्या सुधारित सर्वेनुसार पिंडकेपार टोली येथील ७४ घरांचा निवाडा ५ डिसेंबर २०१२ रोजी पारित झाला होता. ७४ घरांचा सुधारित संयुक्त मोजणी अहवालासह पिंडकेपार टोली येथील ७४ खातेदारांचे मंजूर यादीत क्षेत्रफळामध्ये तफावत आढळून आली. तेव्हापासून हा प्रश्न कायम रेंगाळत आहे. अद्यापही या गावचे पुनर्वसन झाले नाही. वैनगंगा नदीला १९६२ साली महापूर आला होता. त्यामुळे मूळ पिंडकेपार गावातील नदीतिरावरील कुटुंबांना टोलीवर स्थालांतरीत करण्यात आले. तेव्हा ५४ पट्टे भेटले होते. आता तेथे १०५ कुटूंब झाले आहेत. तर ७४ घरांचे पुनर्वसन मंजूर झाले आहेत. बेला येथील राष्ट्रीय महामार्गावर टोलीतील नागरिकांना जागा दिली जाणार असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही सर्वच्या सर्व कुटूंब पिंडकेपार टोलीतच राहतात.गावालगत असलेली ही टोली म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन आणि शेती आहे. दरवर्षी वैनगंगेला पूर आला की गावाला वेढा पडतो. परंतु टोली थोडी उंचावर असल्याने गावाला जेवढा पुराचा फटका बसतो तेवढा टोलीला बसत नाही. मात्र गोसेखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात गाव येत असल्याने आज ना उद्या या धरणाचे पाणी वाढविले जाईल आणि संपूर्ण गाव पाण्याखाली येईल. त्यामुळे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेलाची पार फुटली अन् टोली वाचली
- गतवर्षी २९ व ३० ऑगस्ट रोली वैनगंगा नदीला महापूर आला होता. पिंडकेपार गाव संपूर्ण पाण्याखाली होते. टोलीत पाणी शिरले नाही. याचे कारण म्हणजे बेला जवळची पार फुटली आणि वैनगंगेचे पाणी वाहून गेले. ही पार फुटली नसती तर आमचा जीव वाचला नसता, असे गावकरी सांगतात.
घरात पाणी जाते, कुणाचेच लक्ष नाही
- पिंडकेपार टोलीच्या रहिवासी शोभा मते म्हणाल्या, टोलीवर मोजमाप झाले. परंतु अद्यापही आम्हाला प्लाॅट भेटले नाही. पावसाळ्यात घरात पाणी जाते. नालीचे पाणी वाहून जात नाही. या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही. गतवर्षी पूर आला तरी आमच्या टोलीकडे कुणी आले नाही. पैसेही भेटले नाही. टोलीत पाणी शिरले नाही म्हणून मदत देता येत नाही असे त्या सांगत होत्या.

घर पडले तरी बांधता येत नाही
- पिंडकेपार टोली गावाचे पुनर्वसन घोषित झाल्याने येथे कोणत्याही नागरी सुविधा नाहीत. घरकुल योजनेचा कुणाला लाभही मिळत नाही. घर पडले तरी बांधता येत नाही असे पिंडकेपार टोली येथील बेबी माकडे सांगत होत्या. शासनाने आमच्या मजुरीची व्यवस्था करावी. गेल्या वर्षी पावसाळ्यात घर पडले. परंतु आता घर बांधायला पैसेही नाहीत असे त्या म्हणाल्या. 
अधिकारी केवळ टोलवाटोलवी करतात
- पिंडकेपार टोलीचा रहिवासी राकेश तांबुलकर हा खासगी नोकरी करतो. गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे अशी त्याचीच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु अधिकारी आज होईल, उद्या होईल असे फिरवित आहे. आता कुणाकडे जावे असा प्रश्न आहे. पावसाळा आला की मनात कायम भीती असते असे राकेश सांगत होता.

मंत्रीमंडळ बैठकीत २६ ऑगस्ट २००९ रोजी पिंडकेपार टोलीचे खास बाब म्हणून पुनर्वसन करण्याचा शासननिर्णय ३१ ऑगस्ट २००९ रोजी निर्गमीत झाला होता. त्याअनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंडकेपार टोलीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी तेथे ७४ कुटुंब वास्तव्यास होते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आहे. टोलीची संयुक्त मोजणी झालेली आहे. मोबदल्याचे पैसे विशेष भूअर्जन अधिकाऱ्यांकडे जमा आहेत. लवकरात लवकर मुल्यमापन करुन थेट खरेदीच्या माध्यमातून पिंडकेपार टोलीच्या ७४ पात्र कुटुंबांना मोबदला देण्यात यावा. उर्वरीत कुटुंबासाठीसुद्धा शासनाने प्रस्ताव मंजूर करुन टोलीवासीयांना न्याय द्यावा.
-यशवंत सोनकुसरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

खास बाब म्हणून पुनर्वसनाचे निर्देश 
- पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली या दोन गावांचे खास बाब म्हणून पुनर्वसन करावे असे निर्देश शासनाने दिले आहेत. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार गावची २२६.२९ हेक्टर आर एवढी जमीन असून त्यापैकी १२१.१० हेक्टर म्हणजे ५० टक्के शेतजमीन बाधित होते. मूळ गावठाणातील पिंडकेपार येथील १४६ घरे बाधित होतात. त्या सर्व घरांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. तसेच नवीन वस्ती असलेल्या टोली या गावठाणातील ७४ घरे सुद्धा बाधित क्षेत्रात येत असल्याचा अहवाल मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प यांनी पाठविला आहे. मुळ गावातील १४६ आणि नवीन गावठाणातील ७४ मिळून एकूण २२० घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु अद्यापपर्यंत टोलीचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Will the village rise after being carried to Waingang?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.