दोन कर्मचारी निलंबित : सहाय्यक अभियंत्याने मागितली बदलीप्रशांत देसाई। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जीवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक महिला कर्मचारी संध्या खोब्रागडे या भाजल्या होत्या. यात त्यांचा उजवा हात निकामी झाल्याने गमवावा लागला होता. सोबतच त्यांचा डावा हातही निकामी झाल्याने तो गमवावा लागला असून उजव्या पायाचे बोटही गमवावे लागण्याचा दुर्देवी प्रसंगी त्यांच्यावर ओढविला आहे. यात दोषी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून सहाय्यक अभियंत्याने बदली मागितली आहे.जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील विद्युत जनित्रातून पुरवठा होणारा वीज पुरवठा २९ मे ला बंद झाला होता. तो दुरुस्त करण्याकरिता संध्या खोब्रागडे या महिला तांत्रिक कर्मचारी कर्तव्यावर होत्या. त्यांच्यासोबत जिभे आणि कुंदभरे हे तांत्रिक कर्मचारी होते. यावेळी जीवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने संध्या तारांना चिपकल्या. यात उपचारादरम्यान त्यांना उजवा हात गमवावा लागला होता. त्यांचा डावा हात व उजव्या पायाची बोटे निकामी झाल्याचे वैद्यकीय चमूच्या निदर्शनात आले. त्यामुळे नागपूर येथे उपचारादरम्यान आज गुरुवारला त्यांचा डावा हात व उजव्या पायाची पाच बोटे कापण्याचा दुर्देवी प्रसंग संध्यावर ओढविला. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त लावून धरल्याने सुरुवातीला प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नातील अधिकाऱ्यांनी यात तांत्रिक कर्मचारी कृष्णा जिभे व अजय कुंदभरे यांच्यावर बुधवारला निलंबनाची कारवाई केली. तर दक्षिण क्षेत्राचे सहाय्यक अभियंता अनंत हेमके यांनी सदर प्रकरणात कारवाई होऊ नये या दृष्टीने वरिष्ठांकडे बदली मागितल्याने त्यांची तातडीने अन्य ठिकाणी बदली केल्याचेही समजते. मात्र यात सहाय्यक अभियंता हेमके यांना वरिष्ठांकडून पाठराखण होत असल्याचे दिसून येत आहे.स्वीच दुरुस्तीचे दिले आदेश‘मेंटेनंस अभावी एबी स्वीच वर्षभरापासून सुरुच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने आज गुरुवारला वृत्त प्रकाशित केले. याप्रकारामुळेच अपघात घडल्याची बाब यातून निदर्शनास आणून दिली. यामुळे वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात वरिष्ठांनी सदर सुरु असलेली एबी स्वीच तातडीने दुुरुस्त करण्याचे निर्देश गुरुवारला कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मनसेची गुन्हा नोंदविण्याची मागणीवीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे संध्या खोब्रागडे नामक महिला कर्मचाऱ्यावर दुर्देवी प्रसंगी ओढविला आहे. यात दोषी असलेल्या कार्यकारी अभियंता यांच्यावर भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
त्या महिलेने गमविला दुसराही हात
By admin | Published: June 09, 2017 12:35 AM