गोंडीटोल्यातील नागरिकांचा घरकुलाअभावी संसार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:16+5:30
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आजही घरकुलाअभावी जीर्ण घरात वास्तव्य आहे. दारिद्र्य व रोजगाराचा अभाव त्यामुळे दररोज घरासाठी संघर्ष सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंडीटोला येथे अतिवृष्टीने घर कोसळलेल्या नागरिकांचे धोकादायक घरात वास्तव्य सुरु आहे. जीर्ण घरात वास्तव्य असलेल्या या नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. घरकूल योजनेमध्ये नाव असतानाही लाभ मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत.
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आजही घरकुलाअभावी जीर्ण घरात वास्तव्य आहे. दारिद्र्य व रोजगाराचा अभाव त्यामुळे दररोज घरासाठी संघर्ष सुरु आहे. पोटाकरिता यातील अनेकांची भटकंती सुरु आहे. मात्र गावात आपले हक्काचे घर उभे करण्यासाठी यांना गेल्या काही वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. घरकुल योजनेसाठी रितसर ग्रामपंचायतकडे अर्ज केला आहे. त्यांचे नावही मंजूर झाले आहे. मात्र त्यानंतर आजतागायत घरकुल मंजूर झालेले नाही.
त्यामुळे आज ना उद्या तरी आपल्याला हक्काचे घरकूल मिळेल या आशेवर त्यांची गुजराण सुरु आहे. घराच्या कोसळलेल्या भिंतीवरच असलेल्या छताखालीच त्यांचे वास्तव्य आहे. मात्र कुटुंबियांसह स्वत:चा जीव धोक्यात घालून राहणाºया या कुटुंबियांकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना परिसरातील लोकप्रतिनिधींचे. धोकादायक घरात वास्तव्य असतानाही ग्रामपंचायतकडून या नागरिकांना कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. गावातील बेघरांना आजही घरकुलासाठी फरफटच सुरु आहे. गावातील सभामंडपात धानाची पोती ठेवण्यात आली आहेत मात्र राहण्यासाठी नागरिकांना सभामंडप उपलब्ध होत नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन वावरणाºया या कुटुंबांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी तरी मदतीचा हात देणार काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. ऐन पावसाळ्यात संततधार पावसात कुटुंबाचा संसार उघड्यावर सुरु आहे. त्यामुळे या नागरिकांना त्वरीत घरकुल मंजूर करून देण्याची गरज आहे.
गोंडीटोला येथील सहा कुटुंबीयांची नावे घरकुल योजनेच्या प्रतीक्षा निधीत आहेत. तात्काळ मंजूरी देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे.
-किशोर राहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता बिनाखी.
घरकुल प्रतीक्षा यादीत नाव असले तरी आजही जीर्ण घरातच या कुटुंबीयांचे वास्तव्य असून या जीर्ण घरात राहणाºया कुटुंबीयांना घरकुलाचा त्वरित लाभ दिला पाहिजे.
-संजय राऊत, ग्रामपंचायत सदस्य, गोंडीटोला.