करडी(पालोरा): कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता यावर्षी पहिल्यांदाच कोका वन्यजीव अभयारण्यातील लाखा पाटील शिवतीर्थावर अत्यंत साध्या पद्धतीने भाविकांनी भोलेनाथांचे दर्शन घेत पूजा अर्चना केली. यात्रा व दुकानदारांना परवानगी नाकारल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. तर भाविकांची गर्दीही दिसून आली नाही.
लाखा पाटील येथे दरवर्षी शिवतीर्थावर महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते. दुकानदार व नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी उसळलेली पाहावयास मिळते. यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध सामाजिक व राजकीय संस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन पार पडतात. हजारो भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. रात्रीला परिसरातील गावात सामाजिक नाटक, तमाशे, लावणीचे आयोजन पार पडतात. यात्रेत लाखोंची उलाढाल यानिमित्ताने होत असते.
परंतु यावर्षी कोराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शिवतीर्थवरील यात्रांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे नियोजित कार्यक्रम ठरलेल्या भक्तांमध्ये गोंधळाची परिस्थिती होती. पोहा घेऊन जायचं की नाही गोंधळलेली स्थितीत भोलेभक्तांनी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पायी प्रवास करुन अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चना केली, शिवशंभूचे दर्शन घेतले. शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळू नये, यासाठी भंडारा वनविभाग, कोका वन्यजीव अभयारण्य प्रशासन व कारधा पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता.