कोळी समाज आणि वारकरी संप्रदाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:12 AM2018-07-22T05:12:11+5:302018-07-22T05:12:25+5:30
ज्ञानोबा माउलींनी वारकरी संप्रदायाचा झेंडा रोवून या हरी भक्तीचा पाया रचला, तसेच विठुरायाच्या कानीदेखील मत्स्य कुंडले आहेत, म्हणजे प्रत्येक कोळ्यासाठी ही एक अविस्मरणीय अशीच गोष्ट आहे.
- मोहित रामले
रामायण-महाभारतासारखे दिव्य ग्रंथ ज्यांनी रचले, ते महर्षी वाल्मीकी व वेद व्यास हे कोळी जमातीचेच सुपुत्र होते. याच ग्रंथांमुळे आज जगाला ‘जय जय राम कृष्ण हरी’ या महामंत्रातले श्रीराम व श्रीकृष्ण खऱ्या अर्थाने गवसले.
नवनाथांच्या परंपरेतील प्रमुख गुरू मच्छींद्रनाथ यांचे अवतार कार्यदेखील कोळ्याच्या घरी प्रारंभ झाले, तसेच पुढे नवनाथांपैकीच गुरू गहिनीनाथ यांच्याकडून अनुग्रह घेऊन संत निवृत्तीनाथांनी त्यांचे बंधू संत ज्ञानेश्वर माउली यांना नाथपंथाची दीक्षा दिली. ज्ञानोबा माउलींनी वारकरी संप्रदायाचा झेंडा रोवून या हरी भक्तीचा पाया रचला, तसेच विठुरायाच्या कानीदेखील मत्स्य कुंडले आहेत, म्हणजे प्रत्येक कोळ्यासाठी ही एक अविस्मरणीय अशीच गोष्ट आहे. पंढरीच्या वाटेवर पुणे व सातारा सीमेवर नीरा नदी आहे, तिथे पूर्वी कोळी समाजातील लोक संपूर्ण वारीस आपल्या नौकांमधून नदी ओलांडून पैलतीरी जाण्यास मदत करीत व माउलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्याची पुरातन परंपरा आजही पाहायला मिळते. महाराष्ट्रातील कोळी व आगरी समाजातील बांधव आजदेखील एक ड्रेस (थाट) करून, पंढरीस आपल्या पारंपरिक वाद्यांसह चालत जाताना आपण पाहू शकतो. नवल म्हणजे मुंबई ते पंढरपूर हे अंतर पायी चालत, आमचे कोळी बांधव २ ते ३ आठवड्यांत पार करतात.
पूर्वी कोळीवाड्यातील महिला आषाढी एकादशीला पहाटे आपल्या मुला-मुलींना सोबत घेऊन, समुद्रात स्नान किंवा डुबकी मारायला जात असत, असे केल्याने त्यांना पंढरीच्या चंद्रभागा स्नानाचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा होती.
अनेक कोळीवाड्यांत व आगरी गावात भजनी मंडळ, हरीपाठ मंडळे असतात, तसेच नारळी पोर्णिमेनंतर गावातील राम मंदिरात थेट दहीकाल्यापर्यंत
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले
जाते, ज्यात गावातील लहान-थोर उत्साहाने
सहभागी होतात.
मुंबईतील मांडवी कोळीवाडा, वरळी कोळीवाडा यांच्या धर्मशाळा माउलींच्या आळंदीत पाहावयास मिळतात, तसेच वेसावा कोळीवाड्यातील ‘वाघ्या मुरळी’ नावाचे एक खंडोबा पोवा भगत मंडळ आहे, जे ४ वर्षांतून एकदा जेव्हा कोळ्यांच्या खंडोबाच्या पालख्या माघ पोर्णिमा देवभेटीसाठी जेजुरीला दाखल होतात, तेव्हा वाघ्या मुरळी खंडोबा पोवा मंडळाची पालखी प्रथम पंढरपूर येथे विठोबाच्या भेटीकरिता नेण्याची परंपरा आहे. कारण त्या पालखीत गोपालकाल्याची मूर्ती स्थापित आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, करंजा, मोरा, अलिबाग या कोळीवाड्यातील बांधव हे नित्यनेमाने आळंदी-पंढरपूर येथे वारीकरिता जात, तसेच श्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील पालघर-साटपाटी-मुंबई येथील मांगेला कोळी समाजदेखील वारकरी संप्रदायाशी जवळीक साधतो. याच स्वाध्याय परिवाराच्या हरिनामाच्या संस्कारामुळे दापोली-रत्नागिरी येथील हर्णे-आंजर्लेजवळ पंढरी कोळीवाड्याचा कायापालट केला.
कोळी-आगरी समाजात अनेक डोकरे आजोबा आहेत, ज्यांनी गळ्यात तुळशी माळ घालून वारकरी पंथ स्वीकारला आहे व जीवनभर मांसाहाराचा त्याग केल्याचेही ऐकण्यात आहे, पण असे असले, तरी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कोणतेही खाण्या-पिण्याचे बंधन त्यांनी घातले नाही, जी मुळात वारकरी पंथाची शिकवण आहे. अशीच वारकरी पंथाची पताका घेऊन वेसावा कोळीवाड्यातील कोळी मावश्या तुळशी वृंदावन माथ्यावर धारण करून विठ्ठल गजरात सहभागी झाल्याचा क्षण.