नेत्रदिंडी : एक अशीही वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:08 AM2018-07-22T05:08:21+5:302018-07-22T05:08:50+5:30
महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली परंपरेपैकी असणाऱ्या पंढरीच्या वारीला आता ‘ग्लोबल’ स्वरूप प्राप्त झाले आहे.
- स्वप्निल मोरे
महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली परंपरेपैकी असणाऱ्या पंढरीच्या वारीला आता ‘ग्लोबल’ स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे ही वारी ग्लोबल झाली, तशी तिची रूपेही बदलू लागली. कपाळाला टिळा लावून हाती टाळ घेत ‘माऊली.. माऊली..’ म्हणत पंढरीचा ध्यास घेणारा वारकरी आता काहीसा बदलत आहे. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या स्वरूपातील वारी व दिंड्यांनी या विठुमाऊलीला साद घातली. अशीच एक ‘फेसबुक दिंडी’ गेली आठ वर्षे नेटिझन्सच्या साक्षीने माऊलीच्या नामाचा गजर करीत आहे. यंदा ‘नेत्रदिंडी’ अशी काहीशी आगळीवेगळी संकल्पना असणाºया या वारीची ही गाथा...
फेसबुक दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या वारीतील वारकºयांची छायाचित्रे, व्हिडीओ तसेच लाइव्ह अपडेट्ससोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून तरुणांची धडपड आपण पाहिलीच आहे. यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून नेत्रवारीची संकल्पना मांडण्यात आली आहे. दिंडीच्या मार्गावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्रदानाचा जागर करण्यात येणार आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३३वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे ८वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी टीमने यंदा औरंगाबादच्या व्यंकटेश परिवार या अंध बांधवांसाठी काम करणाºया सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याची देही याची डोळा.. असे म्हणत लाखो वारकरी पायी पंढरपूरपर्यंत चालत येतात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सामील होता येत नाही असे लाखो ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद गेल्या सात वर्षांपासून मिळवित आहेत.
आजही आपल्याच समाजातील एक घटक पंढरीच्या वारीचा हा सुख सोहळा पाहण्यापासून वंचित आहे आणि ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना ही वारी कशी दाखवू शकतो? या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाला आहे. पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे. पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी या वर्षी ‘नेत्रवारी’ या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करीत आहे.
नेत्रदान करा!
आतापर्यंत या नेत्रदिंडीच्या वारीत ८००हून अधिक जणांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेऊन अर्ज भरला आहे. हा अर्ज फेसबुक दिंडीच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देतानाच लोकांना नेत्रदानाचे आवाहन करणारा ‘नेत्रवारी’ नावाचा लघुपटही बनविण्यात आला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे. फेसबुक दिंडीसोबतच नेत्रवारी यशस्वी करण्यासाठी स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओम्कार मरकळे, सुमीत चव्हाण, ओम्कार महामुनी कार्यरत आहेत.
सामाजिक आशयांचा धागा
२०१६ साली फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ या जलसंधारणाच्या मोहिमेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल १५ लाख नागरिकांनी फेसबुक दिंडीच्या पेजला भेट दिली. या वेळी एका ‘लाइक’मागे १ रुपया जमा होणार होता. ते पैसे जलसंधारणाच्या कामासाठी खर्च करायचे होते, त्याप्रमाणे १५ लाख रुपये बारामतीच्या बºहाणपूर आणि कारखेल या गावांत जलसंधारणाची कामे करण्यासाठी खर्च करण्यात आले. गेल्या वर्षी ‘वारी ‘ती’ची’ हा उपक्रम राबविण्यात आला. तर यंदाच्या नेत्रवारी मोहिमेलादेखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे.